
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल लष्करातील जवान रोनीमंडल रवींदरनाथ (वय 34, हल्ली रा. एमआयआरसी नगर, मुळ रा. चाकबलाराम, राज्य- पश्चिम बंगाल) याला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदानुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी हा निकाल दिला. अॅड. अर्जुन पवार यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
रोनीमंडल रवींदरनाथ हा नोव्हेंबर 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीच्या घरात रात्री साडे बारा वाजता घुसला. तिच्याशी गैरवर्तन करत होता. या मुलीने मदतीसाठी आरडा-ओरड केल्यावर तिचे वडील मदतीला आले. त्यावेळेस मुलीची आई ही तेथे आली. तिने घरातील विजेचे दिवे लावले. तो व्यक्ती पळून जाऊ लागला. त्याच वेळेस त्याचा मोबाईलमधून फोटो काढला. त्या व्यक्तीच्या अंगामध्ये टी शर्ट होता.
त्यावरती 88 नंबर लिहलेला होता. तो 88 रेजिमेंटचाच जवान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो त्याचा टी शर्ट तेथेच सोडून झटका देवून पळून गेला होता. मुलीच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक वैशाली गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर आलेले कागदोपत्री पुरावे तसेच साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून रोनीमंडल रवींदरनाथ याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 10 प्रमाणे दोषी धरून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 15 हजार रूपये दंड तसेच बेकायदा घरात घुसल्याबद्दल एक वर्षे शिक्षा व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलीस अंमलदार के. एन. पारखे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.