मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास 10 वर्षे सश्रम कारावास

मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास 10 वर्षे सश्रम कारावास

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर परिसरात 2019 साली अत्याचाराची ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत फिर्यादीत उल्लेख केल्यानुसार मतिमंद मुलगी सायंकाळी आपल्या गाई चारून घरी आली होती. त्यानंतर ती घराशेजारी असलेल्या एका कुटुंबियाकडे टीव्ही पाहण्यासाठी गेली होती.

यानंतर ती गायब झाली होती. मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती जवळपास कोठेही आढळून आली नाही. रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराकडे येताना दिसली. तिच्या पाठीमागे थोड्या अंतरावर आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी हा देखील येताना दिसला. मुलगी घाबरून तिच्या आईजवळ गेली. तिला कोठे गेली होती असे विचारले असता तिने अर्जुन जोशी याच्याकडे बोट दाखवून त्याने तिला नेल्याचे खुणावून सांगितले. तसेच अर्जुन जोशी याने बळजबरीने अत्याचार केल्याचे सांगितले.

पोलिसांनी तपास करून अर्जुन जोशी याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर झाली. सरकारपक्षाच्यावतीने सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी प्रबळ युक्तीवाद केला. तसेच मतिमंद मुलीची विशेष शिक्षक यांचेकडून पीडितेची साक्ष कोर्टात नोंदविली. न्यायालयाने पीडितेची साक्ष व विशेष शिक्षकाची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिना कैद अशी शिक्षा सुनावली.

सदर खटल्यामध्ये सरकारी वकील संजय वाकचौरे यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण डावरे, सहाय्यक फौजदार रफिक पठाण, दिपाली सहाणे, नयना पंडीत, स्वाती नाईकवाडी यांनी विशेष सहकार्य केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com