
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची कन्या डॉ.निवेदिता व माजी मंत्री तथा नेवासाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन यांच्या विवाहसोहळा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. या सोयरिकीचा राजकीय प्रभाव चर्चेच्या केंद्रस्थानी असून नेवासे-पाथर्डी-शेवगाव या राजकीय पट्ट्यात गडाख-घुले गटाच्या प्रभावाचा विस्तार विवाह सोहळ्याला उपस्थित ‘साक्षीदारां’च्या मोठ्या गर्दीवरून स्पष्ट झाला. त्यामुळे आगामी काळात हे नातेसंबंध जिल्ह्याच्या राजकारणावर काय प्रभाव टाकणार, या प्रश्नाच्या उत्तराकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची नात व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची द्वितीय कन्या डॉ.निवेदिता व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा नातू व माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन यांचा विवाह रविवारी पार पडला. सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील प्रभावी नेत्यांची उपस्थिती आणि ओसंडून वाहिलेल्या वर्हाडींची संख्या जिल्ह्याने अनुभवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, युवासेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर पाटील, आ.शहाजीबापू पाटील, आ.किरण लहामटे, आ.मोनिका राजळे, आ. डॉ.सुधीर तांबे, आ.बबनराव पाचपुते, आ.संग्राम जगताप, आ.रणजितसिंह मोहिते, आ.किशोर दराडे, आ.उदयसिंह रजपूत, आ.सुनील शिंदे, आ.सुहास कांदे, आ.लहू कानडे, आ.आशुतोष काळे, आ.नीलेश लंके, सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, आ.ज्ञानराज चौघुले, सुरेश धस, राजेंद्र नागवडे, राजेंद्र फाळके, भाऊ कोरेगावकर, अविनाश आदिक, अनुराधा आदिक, करण ससाणे, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, आ. शंकरराव गडाख, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, राजेंद्र घुले पाटील, सुनीताताई गडाख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले, विश्वासराव गडाख, विजय गडाख, सुनील गडाख, डॉ.क्षितिज घुले पाटील या गडाख-घुले परिवारातील सदस्यांकडून पाहुण्यांची झालेली सरबराई लक्षवेधी होती.
नगर जिल्ह्याच्या राजकारणात मारुतराव घुले यांचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे. वेळप्रसंगी त्यागाची भूमिका घेऊन संघटनेत आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम त्यांनी केले. दोन्ही परिवारातील पहिली पिढी एकमेकांना ताकद देत पुढे सरकली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील राजकारणानंतर घुले-गड़ाख परिवारात कटुता वाढली. शरद पवार यांच्या शिष्टाईने 2019 च्या निवडणुकीआधीच दोन्ही परिवार पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख यांच्या विजयासाठी दोन्ही परिवारात झालेली राजकीय सहमती तर जिल्ह्याने पाहिली.
पुढे या मैत्री संबंधाचे रूपांतर नातेसंबंधात झाल्याने या परिवारातील ऋणानुबंध अधिकच घट्ट झाले आहेत. यामुळे आधीच ताकदीच्या असलेल्या राजकीय परिवाराचा विस्तार झाला आहे. नेवासेचे गडाख, शेवगावचे घुले, पाथर्डीचे राजळे, राहुरीचे तनपुरे, संगमनेरचे थोरात, कोपरगावचे काळे, श्रीगोंद्याचे जगताप या प्रभाव विस्ताराने जिल्ह्यातील अर्धा भाग व्यापला आहे. राजकारणात एक अधिक एक दोन होत नसले तरी या सर्व परिवारांवर बारामतीच्या पवारांचा प्रभाव आणि स्नेह लपून राहिलेला नाही. त्यामुळे गडाख-घुले नातेसंबंध या विस्ताराचे एक टोक असले तरी त्याचा राजकीय प्रभाव कोणीही अमान्य करणार नाही. त्यामुळे आगामी काळात या विस्तारीत प्रभावाची समिकरणे कोणती असतील, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न होणार हे नक्की !
गर्दीचे मानसशास्त्र
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोनई येथे मुळा पब्लिक स्कूलच्या विस्तीर्ण प्रांगणात जनसागर लोटला. राजकारणात जोडून घेणे, या कृतीला मोठे महत्व आहे. यानिमित्ताने गड़ाख-घुले परिवारामागेे नेवासे-शेवगाव-पाथर्डी या क्षेत्रात असलेली पाठीराख्यांची शक्ती यानिमित्ताने समोर आली. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेशही कार्यकर्त्यांना गेल्याचे मानले जाते.
वर्हाडी पवार
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार आमदार शंकरराव गडाख यांच्या विवाहात मामा म्हणून उपस्थित होते. त्यानंतर आज 26 वर्षानंतर 22 जानेवारी रोजी झालेल्या आमदार गडाख यांचे सुपूत्र उदयन यांच्या लग्नात त्यांच्या प्रमुख उपस्थितीने गडाख-घुले परिवारावरील त्यांचा स्नेह दिसून आला.