
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील पूर्व भागातील घोयेगाव, गोधेगाव, आपेगाव, तळेगावमळे व धोत्रे या पाच गावांना नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याअंतर्गत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मंजूर करावे ,अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव, गोधेगाव, आपेगाव, तळेगावमळे व धोत्रे या पाच गावांना पुर्वी दारणा धरणाच्या नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातून कोळनदीपात्रातील वैजापूर नगरपालिकेने आरक्षीत केलेल्या पाण्याच्या साठवण बंधार्याच्या पाझरामार्फत पाण्याचा लाभ मिळत होता. परंतु गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वैजापूर नगरपालिकेने स्वतंत्र जागेत साठवण तलाव बांधून कोळनदी पात्राऐवजी नवीन साठवण बंधार्यातून पाणी वापर सुरू केलेला आहे. त्यामुळे या गावांना जिल्हा परिषदेमार्फत विहिरीतून केल्या जाणार्या पिण्याचे पाणी व पशुसंवर्धनासाठी या योजना ओस पडलेल्या आहेत.
सदर गावांचे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याद्वारे मंजूर करून ते वितरीका क्रमांक एकचा फाटा क्रमांक वन आर मधून पूर्ववत कोळनदीपात्रात बांधलेल्या साठवण बंधार्यात सोडण्यात यावे. म्हणजे या गावांचा पिण्याच्या व जनावरांचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जाईल. तरी याप्रकरणी संबंधित अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करावी. कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याकडे याबाबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून त्याचा प्रस्ताव मार्गी लागावा म्हणूनही पाठपुरावा सुरू आहे, असेही विवेक कोल्हे म्हणाले.