
बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे गुरुवारी सायंकाळी स्वयंपाकाच्या गॅसच्या टाकीतून गॅस गळती होऊन पेट घेतला गेल्याने दोघे जण भाजून जखमी झाल्याची घटना घडली असून यात घरातील वस्तू, अन्नधान्यासह कपडे व रोख रक्कम खाक झाली.
याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील दत्तात्रय गणपत पवार यांच्या राहत्या घरी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुशिलाबाई पवार (वय 58) यांनी चहा बनवण्यासाठी गॅस शेगडी चालू केली असता गॅसच्या नळीतून गॅस गळती झाली. गॅसची नळी पेटली. घरात सर्वत्र गॅस व जाळ पसरला. यात सुशिलाबाई पवार (वय 58) व त्यांचा मुलगा संदीप पवार (वय 37) हे भाजून जखमी झाले. त्यांना टाकळीभान येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले.
या घटनेत सुशिलाबाई भाजल्याने जखमी झाली. त्यांच्या मुलाने त्यांना वाचवले. त्याने ताबडतोब पेटलेली गॅसची टाकी घराबाहेर काढली. त्याच्या हातालाही भाजून इजा झाली. घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या तसेच धान्याच्या गोण्या देखील जळून गेल्या. कपाटात असणारे कपडे, शासकीय कागदपत्रे तसेच रोख 27 हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली. घरात लहान मोठे मिळून 11 सदस्यांचे हे कुटुंब आहे. जर मुलाने तत्परता दाखवली नसती तर मोठी जीवित हानी झाली असती.