घोडेगाव तालुका निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासन समितीकडे दाखल

घोडेगाव तालुका निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासन समितीकडे दाखल

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोडेगाव तालुका निर्मितीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन समितीकडे पाठविला असल्याची माहिती फुले शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना वैरागर यांनी सांगितले की, घोडेश्वरीच्या नावाने महाराष्ट्रात जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव तालुक्याची निर्मिती करून सदर तालुका अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यात यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडील समयोचित निर्देशानुसार तहसीलदार नेवासा यांच्याकडील परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासन समितीकडे पाठविला आहे.

मूळ नेवासा तालुक्याची सन 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या तीन लाख 57 हजार 323 आहे. नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, कुकाणा, सलाबतपूर, घोडेगाव, चांदा, सोनई, वडाळा अशी 8 मंडळ संख्या, एकूण गावे 127, एकूण क्षेत्रफळ एक लाख 34 हजार 613 हेक्टर असून चतु:सीमा पूर्व-शेवगाव तालुका, दक्षिण-नगर तालुका, पश्चिम-श्रीरामपूर तालुका व उत्तर-औरंगाबाद जिल्हा अशी आहे.

विभाजनानंतर उर्वरित नेवासा तालुका लोकसंख्या एक लाख 81 हजार 642, मंडळ संख्या चार-नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर व कुकाणा, क्षेत्रफळ 65,214.26 हे. आर. एकूण 74 गावे व चतु:सीमा पूर्व-शेवगाव तालुका, दक्षिण-प्रस्तावितघोडेगाव तालुका, पश्चिम-श्रीरामपूर तालुका व उत्तर-औरंगाबाद जिल्हा अशी असेल.

प्रस्तावित नवीन घोडेगाव तालुका लोकसंख्या एक लाख 75 हजार 681, मंडळ संख्या चार घोडेगाव, चांदा, सोनई, वडाळा बहिरोबा, क्षेत्रफळ 61 हजार 271 हेक्टर एकूण 53 गावे व चतु:सीमा पूर्व-शेवगाव तालुका, दक्षिण-नगर तालुका, पश्चिम-राहुरी तालुका व उत्तर उर्वरित नेवासा तालुका अशी असेल.

प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मितीसाठी एकूण 18 शासकीय कार्यालयासाठी अंदाजे एक अब्ज 42 कोटी 16 लाख 37 हजार 549 इतका आवर्ती खर्च आणि 99 कोटी 26 लाख 77 हजार रुपये अनावर्ती खर्च आवश्यक आहे. शासकीय कार्यालय निवासस्थाने याकरिता घोडेगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच शासकीय क्षेत्र एकूण बारा हेक्टर 34 आर प्रस्तावित केलेले असून सदर क्षेत्रामध्ये रस्ते, वीज, पाणी या नागरी सुविधा उपलब्ध आहेत.

घोडेगाव तालुक्यात प्रस्तावित केलेल्या ग्रामपंचायत ठरावाची संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार नेवासा, गटविकास अधिकारी, नेवासा कामगार तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तसेच नेवासा भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांचेकडील आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजपत्रित अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले असून कामगार तलाठी यांचेकडून 127 गावाचे क्षेत्र, क्षेत्रफळ, शेतकरी जमीन महसूल याबाबत सर्व गावनिहाय माहिती अद्ययावत केली आहे. प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मितीने सर्वसामान्य जनतेचा वेळ, पैसा व श्रमात बचत होणार असल्याची शिफारस विशेष लक्षवेधी ठरली आहे. प्रस्तावामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याची संपूर्णपणे दक्षता घेतली आहे.

घोडेगाव तालुका निर्मिती प्रस्तावाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक व शासकीय दृष्टिकोनातून अवघड असलेले काम वाडवडीलांचे आशीर्वाद तसेच राजपत्रित अधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांचे सहकार्याने शक्य झाले आहे. श्री घोडेश्वरी आणि श्री विठ्ठल देव प्रशासक नियुक्ती, घोडेगाव हद्दीत बाजार क्षेत्र समावेश आणि घोडेगाव तालुका निर्मिती या शासकीय संघर्षाच्या प्रवासात अनेक प्रसंग आले ते कायम स्मरणात राहतील.

- सुधीर नाथा वैरागर

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com