घोडेगावला राज्य महामार्ग झाला जलमय

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष || जागोजागी साचले डबके
घोडेगावला राज्य महामार्ग झाला जलमय

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे नगर-संभाजीनगर राज्य महामार्ग पावसाच्या पाण्याने जलमय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. नगर ते संभाजीनगर राज्य महामार्गावर घोडेगाव हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. येथील कांदामार्केट, जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे.

जवळच असणारे जगप्रसिद्ध शनिशिंगणापूरमुळे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. चौपदरी रस्ता असूनही पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने जागोजागी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. गुरुवार दि.6 रोजी रात्री झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनधारकांना रस्ता व रस्त्यातील खड्डे दिसतच नव्हते. रस्त्यातील खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान, अपघात होत आहेत. दुचाकीस्वार अनेकवेळा पडले.

काही नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईना. या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे. त्यातच रस्त्याचे पूर्व बाजूने गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम चालू आहे. रस्त्यावर माती पसरली असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे गाड्या घसरत आहेत. गॅस पाइपलाइन ठेकेदाराने रस्त्याचे कडेला बांधलेल्या गटारी ही तोडल्या आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जायला मार्गच राहिलेला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com