घोडेगाव सोसायटीच्या सचिवाचा अजब कारभार

उपनिबंधकांचा आदेश धाब्यावर बसवून केल्या सह्या
घोडेगाव सोसायटीच्या सचिवाचा अजब कारभार

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

तालुक्यातील घोडेगाव सोसायटीमध्ये लाखो रुपयांचे घोटाळे झाल्याची बातमी ‘सार्वमत’ने उजेडात आणली होती. याची तक्रार सोसायटीचे चेअरमन आणि सचिवाच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर अहमदनगर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी 20 फेब्रुवारी 2020 पासून संस्थेचे सचिव सचिन मचे यांचे सह्यांचे अधिकार कमी केले.

तरीही गेली चार महिने म्हणजे 20 जून 2020 अखेर सचिव मचे यांनी सह्यांचा अधिकार वापरून सभासदांना दाखले आणि जमा पावत्या दिलेल्या आहेत. उपनिबंधकांचा आदेश धाब्यावर बसवून या सोसायटीचा कारभार चालू आहे.

घोडेगाव सोसायटीचे गंगाराम मचे हे संचालक असून त्यांचा एक मुलगा संस्थेचा चेअरमन आहे, त्यांचे चिरंजीव सचिन मचे यांना सचिव केलेले आहे. तर कुटुंबातीलच काही व्यक्ती संचालक आहेत. या सोसायटीचा गेल्या अनेक वर्षांपासून अजब कारभार चालू आहे.

बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून, त्यांच्याशी आर्थिक तडजोडी करून सभासदांच्या नावावर खोटी-नाटी कर्जे चढविली जात आहेत. काही सभासदांची खोटीनाटी कर्जे शासनाच्या 30 सप्टेबर 2019 अखेरच्या थकबाकीत बसवून ती माफही झाली आहेत.

बापू मचे यांच्या मते, या सोसायटीत सुमारे 200 सभासद आहेत. त्यापैकी सुमारे 50 सभासदांच्या नावावर कर्ज काढलेली आहेत. त्यापैकी 25 सभासदांना आजिबात माहिती नसताना त्यांच्या बनावट सह्या करून लाखो रुपयांची कर्जे चेअरमन यांनी काढली आहेत.

संस्थेचे चेअरमन एवढे निर्ढावलेले आहेत की, ते कोणालाच दप्तर ताब्यात देणार नाहीत. कारण हे दप्तर त्यांचा जीव की प्राण आहे. आख्खी सोसायटी चेअरमनने एका मोठ्या पिशवीत भरून ठेवलेली आहे. सोसायटीच्या 78 सभासदांनी संस्थेची चौकशी करून बोगस कर्जातून सभासदांची मुक्तता करावी व संस्था अवसायनात (लिक्विडेशन) काढावी, अशी मागणी केली आहे.

आढळगाव जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी या सोसायटीच्या कर्ज व्यवहारामध्ये पूर्णपणे बरबटलेले आहेत. त्यांना कर्ज माहितीसाठी पाठविलेले रजिस्टर ए. डी. चे पत्र त्यांनी प्रेक्षकांचे नाव पाहून स्वीकारले देखील नाही. मालक घेत नाही, असा पोस्टमनचा शेरा मारून ते मला परत आल्याचे बापू मचे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com