
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
कांदा दरातील झालेल्या प्रचंड घसरणीमुळे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये काल सोमवारी मागील वर्षभरातील निच्चांकी आवक नोंदली गेली. काल सोमवारी अवघी 7 हजार 651 कांदा गोण्यांची आवक झाली. मागील जवळपास दोन वर्षांतील आवकेचा हा निच्चांक आहे.
काल एक-दोन लॉटला 1200 ते 1250 रुपयांचा भाव मिळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला 1000 ते 1100 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 800 ते 950 रुपये, गोल्टा कांद्याला 600 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 400 ते 500 रुपये, जोड कांद्याला 150 ते 400 रुपये इतका भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये भाव मिळाला.
भावातील प्रचंड घसरणीमुळे सध्या कांदा विक्रीसाठी आणणे तोट्याचे असल्यामुळे शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत असून त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. आवक घटलेली असतानाही भावातही फारशी सुधारणा होताना दिसत नाही. दोनशे रुपयांनी भावात वाढ झाली. मात्र ती केवळ आवक घटल्यामुळे झाली आहे. आवक वाढताच भाव पुन्हा हजाराच्या खाली जाण्याची शक्यता आहे.