घोडेगाव येथे राज्य महामार्गावर आज रास्तारोको

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याचा निषेध
घोडेगाव येथे राज्य महामार्गावर आज रास्तारोको

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारले जाणार असे घोषित केले. त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने निषेध म्हणून आज सोमवारी सकाळी दहा वाजता रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष त्र्यंबक भदगले यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना नुकताच कुठे थोडासा भाव मिळायला लागला होता. पण शासनाने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचे जाहीर केले. या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले. परिसरातील शेतकरी बांधवांनी या आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे यांनी यावेळी केले. शेतकरी संघटनेची बैठक घोडेगाव मार्केट यार्ड कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अशोक एळवंडे, सुदाम तागड यांचेसह आडतदार, व्यापारी हमाल माथाडी संघटनेचे दिगंबर सोनवणे उपस्थीत होते.

शासनाचे कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क हे अन्याय करणारे आहे. शेतकर्‍यांचा कांदा निम्मा खराब झाला मागील अनुदान सरसकट मिळाले नाही. आताच शेतकर्‍यांच्या हाती थोडा भाव मिळायला लागल्यावर निर्यातीवर शुल्क आकारले जाते आहे. कारण शेतकर्‍यांना हे सरकार मदत करु इच्छित नाही अशी प्रतिक्रिया सोनईच्या अशोक बेल्हेकर सोनई या शेतकर्‍याने यावेळी व्यक्त केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com