घोडेगावचा जनावरांचा बाजार उद्यापासून होणार पूर्ववत सुरू

28 दिवसांपूर्वी जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरणासह विविध अटी व शर्तींचे करावे लागणार पालन
घोडेगावचा जनावरांचा बाजार उद्यापासून होणार पूर्ववत सुरू

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारमध्ये उद्या शुक्रवार दि.23 डिसेंबर पासून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.

लंपी आजाराचे पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यांपासून राज्यासह नगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार 9 सप्टेंबर पासून बंद होते. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरण यामुळे लम्पी आजार आता आटोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाने आ. शंकरराव गडाख यांच्याकडे बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. बाजार सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने शुक्रवारपासून बाजार सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या परवानगीत अटी व शर्तींचे पालन करून हा बाजार भरविला जाणार आहे. जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्म रोगा करिता 28 दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी बंधनकारक असेल.

गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम, 2001 मधील नियम क्र.47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय खरेदी-विक्री होऊ देऊ नये. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची आहे.तसेच सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी बाजार समिती परिसरामध्ये टॅगींग नसलेले, लसीकरण प्रमाणपत्र नसलेले व विहीत नमुन्यातील आरोग्य, वाहतूक प्रमाणपत्र नसलेल्या पशुधनास प्रवेश देण्यात येऊ नये किंवा त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल, व्यावसायिक यांनी आनंद व्यक्त केला. अनेक महिन्यांपासून बाजार बंद असल्याकारणाने बाजारावर अवलंबून असणार्‍या सर्व घटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकर्‍यांना व पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला, बाजार सुरू होत असल्याने सर्वांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आ.शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com