
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा काहीसा जोर वाढला आहे. घाटघरला 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात पडलेल्या भंडारदरातील पावसाची नोंद 15 मिमी झाली आहे.
काल दिवसभरात धरणात नव्याने 63 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल बुधवारी सायंकाळी 10749 दलघफू (97.37 टक्के) झाला आहे.
पाणलोटात पाऊस कमी झाल्याने दहा दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. पण कालपासून पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. पाणलोटात गारवा निर्माण झाला असून अधूनमधून रिपरिप सुरू आहे.
मुळा पाणलोटातून पावसाने काढता पाय घेतला होता. पण हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काल बुधवारी सकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 1633 क्युसेक होता.
तो सायंकाळी 1393 झाला होता. या धरणातील पाणीसाठा सकाळी 20770 दलघफू 20789 दलघफू झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 80 टक्के झाला होता. पिण्याच्या पाण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या काही शेतकरी तुषार पध्दतीने पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.