खारेकर्जुने येथे साकारली एकलव्यांसाठी घरकुल योजना

खासदार डॉ. सुजय विखे यांची संकल्पना : केंद्राच्या योजनांचा लाभ मिळवून देणार
खारेकर्जुने येथे साकारली एकलव्यांसाठी घरकुल  योजना

अहमदनगर (तालुका प्रतिनिधी) - एकलव्य समाज हा उदर निर्वाह करण्यासाठी खारेकर्जुने येथील के.के.रेंज परिसरामध्ये 50 वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यांना पहिल्यांदा रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड मिळून दिले. त्यानंतर स्वत:चे हक्काचे घर असावे, या उद्देशाने खारेकर्जुने येथे 20 गुंठ्ठे जागा खरेदी केली. या ठिकाणी केंद्र सरकारच्या योजनेतून 60 घरांचा प्रकल्प राबविण्यात आला. उर्वरित 15 घरांचा प्रकल्पही लवकरच मार्गी लावू, असे आश्‍वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. या कामासाठी कैलास लांडे, खरेदी विक्री संघाचे संचालक अंबादास शेळके, माजी सरपंच सबाजी पानसंबळ यांनी पाठपुरावा केल्यामुळे या घरकुल योजनेला यश मिळाल्याचे खा. विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे खा. डॉ. विखे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या एकलव्य समाजासाठी पूर्ण झालेल्या घरकुल योजनेची पाहणी गुरूवारी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक शेळके, लांडे, माजी सरपंच पानसंबळ, अजित तांबे, अमोल निमसे, रसिद सय्यद, लहानू बोरूडे, अनिल निमसे, रामेश्‍वर निमसे, विजय लांडगे, भाऊसाहेब काळे, ग्रामसेविका श्रीमती प्रियंका भोर आदी उपस्थित होते.

खा. डॉ. विखे म्हणाले, एकलव्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डीजीटल अंगणवाडी सुरू करण्यात येईल. पाण्याची टाकी, धोबी घाट, सभा मंडप, आदीसह योजना पुढील काळात राबवू, असे आश्‍वासन दिले. तर लांडे म्हणाले, एकलव्यासाठी राबविण्यात येणार्‍या घरकुल योजनेमध्ये विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु खा.विखे यांनी मार्ग काढत हा प्रकल्प राबविला. त्यामुळे 60 कुटुंबाला स्वत:चे हक्काचे घर मिळाले असून पुढील काळात 15 कुटुंबानाही याच ठिकाणी घर मिळणार आहे. सनफार्मा व क्राम्प्टन कंपनीने या ठिकाणी विविध कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी विविध स्वच्छ भारत अभियान, नरेगा शौचोलय, शबरी आवास योजनेचा निधी उपलब्ध झाला असल्यामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com