गरजवंत लाभार्थींना घरकुल मिळविण्यासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी व निकष शिथिल करा - डॉ. मुरकुटे

गरजवंत लाभार्थींना घरकुल मिळविण्यासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी व निकष शिथिल करा - डॉ. मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र सरकारच्या जाचक निकषांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजनेसाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ड वर्ग यादीतील नागरिकांचा रोष स्थानिक ग्रामपंचायतीवर विनाकारण ओढवला जात आहे. पंचायत समितीचे ग्रामपंचायत व नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. यामधील काही नियमांमुळे गरजवंत लाभार्थींना घरकुल मिळण्यापासून वंचित रहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरच्या जाचक अटी व निकष शिथील करण्याची मागणी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केली आहे.

केंद्र सरकार, राज्य शासन तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे आदींसह जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतमार्फत घरकुल योजनेसाठी ड वर्ग यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादीतील लाभार्थींना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पूर्तता करण्याचे सांगितले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहन, किसान क्रेडिट कार्ड नसावे, असे अनेक निकष असल्यामुळे घरकुलास पात्र असलेल्या व्यक्तींनाही खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या निकषामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकार्‍यांना लाभार्थींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही निकष शिथील करणे गरजेचे असल्याचे डॉ.मुरकुटे यांनी म्हटले आहे.

या घरकुल योजनेत गरजवंत लाभार्थींचा समावेश होण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन घरकुलास पात्र असलेल्या गरजू लाभार्थींची नावे घेऊन ठराव करून पंचायत समितीकडे ग्रामसेवकामार्फत जमा करावा. त्यानंतर पंचायत समितीमार्फत सदर ठराव असलेली शासन मान्य यादी मंजुरीसाठी अहमदनगर येथे पाठविली जाणार आहे. या घरकुल योजनेतून पात्र लाभार्थींना वंचित ठेवू नये, असेही सभापती डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com