
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील शहरी व ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत वाळू उत्खननं, वाहतूक, साठवणूक व विक्री साठवणूक व विक्री व्यवस्थापन याबाबत सर्वकष धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव (ता. श्रीरामपूर) येथे वाळू डेपो उभारण्यात आला आहे. या वाळू डेपोमध्ये पुरेसा वाळूसाठा नायगाव व मातुलठाण येथील मंजूर वाळू गटातून उपलब्ध करण्यात आला आहे. या वाळू डेपोमधुन तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना यामधील मंजूर लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू देण्यात येणार आहे.
या घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांनी मोफत 5 ब्रास वाळू करीता ऑनलाईन पध्दतीने महाखनिज प्रणालीवर वाळूची नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी करण्याकरीता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय श्रीरामपूर येथे वाळू विक्री नोंदणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या केंद्रामध्ये मंजूर घरकुल लाभार्थ्याने वाळूची नोंदणी करण्याकरीता येताना प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनांचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड याची मुळ प्रत सोबत घेऊन यावे, जेणेकरुन महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी करणे सोयीचे होईल, असे आवाहन प्रभारी तहसीलदार आर. जे. वाकचौरे यांनी केले आहे.