
घारगाव |वार्ताहर| Ghargav
चोरट्यांनी बंगल्याच्या स्वयंपाक गृहाचे लोखंडी दरवाजाचे आतील बाजूचे कुलूप तोडून लाकडी दरवाजाला धक्का देत बंगल्यात प्रवेश करत कपाटातील सामानांची उचकापाचक केली. मात्र, बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना घरातील सदस्य जागे झाल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला व दरवाजा न उघडल्याने आहेर कुटुंबीय बचावले. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात मंगळवारी (दि.31) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
राजहंस दूध संघाचे माजी व्हॉईस चेअरमन सुभाष आहेर हे आपल्या कुटुंबियांसोबत घारगाव येथे राहतात. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान त्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. प्रथमतः चोरट्यांनी आतील खोल्यांच्या दरवाजांच्या बाहेरुन कड्या लावल्या. कपाट उचकटून त्यातील सामानाची उचकापाचक केली. त्यात काही मिळून न आल्याने चोरट्यांनी आहेर यांचा मुलगा राजेंद्र यांच्या बेडरूमची खिडकी उघडून एका बांबूच्या काठीच्या सहाय्याने आतील बाजूची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेंद्र यांची पत्नी दीपा हिस आवाज आल्याने तिने आरडाओरडा सुरु केला. घरातील इतर मंडळींना जाग आल्यामुळे चोरटे पसार झाले. दरवाजा न उघडल्याने आहेर कुटुंबीय यात बचावले.
दरम्यान, परिसरातील माजी मंडल अधिकारी दादापाटील आहेर यांच्या बंगल्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. घर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर लाड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत नागरिकांना चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली. वाढत्या चोर्यांमुळे ग्रामस्थ, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी राहावे लागत आहे. याबाबत पोलिसांनी रात्रीची गस्त करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.