अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीच्या दुसर्या लाटेत सामाजिक भावनेने कार्य करत असलेल्या घर घर लंगर सेवेच्या

वतीने मनपाच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतिगृह या दोन ठिकाणी गुरु अर्जुन देव कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून घर घर लंगर सेवेचे सामाजिक कार्य सुरू असून मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल 8 महिने गरजू व परप्रांतीय लाखो नागरिकांना जेवण देण्याचे कार्य केले होते.

करोनाच्या दुसर्या लाटेने सर्वच भयभीत व चिंताग्रस्त आहेत. शहरासह जिल्ह्यात करोनाचे संक्रमण वाढत असताना प्रशासनाच्यावतीने घर घर लंगर सेवेचे सामाजिक कार्य पाहून त्यांना कोव्हिड सेंटर चालवून सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याची विनंती करण्यात आली. लंगर सेवेच्यावतीने 3 मार्चपासूनच कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. लंगर सेवेने केलेल्या सामाजिक कार्य व योगदानातून शहरात मोठे सामाजिक कार्य उभे राहिले असून सर्वांच्या मनात एक आदर व विश्वास निर्माण केला आहे.

मागील टाळेबंदीत व त्यानंतर देखील घर घर लंगर सेवा व अहमदनगर पोलीस दलाने दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने 22 मार्च ते 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत तब्बल 8 महिने 6 दिवसांत शहरातील 4 लाख 26 हजार 400 लोकांना जेवणाचे पार्सल, 2 हजार 350 रेशनिंग व किराणा किट, 115 दिवस मन्सूरी युनानी काढ्याचे वाटप केले. 11 हजार श्रमिक प्रवाश्यांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली होती.

तसेच 650 झोपडपट्टीतील विद्यार्थ्याना शिक्षण साहित्य, 38 विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचे वितरण केले. अनेक परप्रांतीयांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडण्याचे सामाजिक कार्य करण्यात आले. तर फक्त महिलांकरिता जैन पितळे वसतीगृहात गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली होती.

यामध्ये अनेक करोनाग्रस्त महिला चांगले होऊन घरी परतल्या. पुन्हा घर घर लंगर सेवेच्या वतीने मनपाच्या सहकार्याने दोन ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना निशुल्क सेवा दिली जात आहे. या कार्यासाठी लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा, जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी प्रयत्नशील असून, मनपा आयुक्त शंकर गोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपआयुक्त यशवंत डांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.