लसीकरण करा, नाहीतर मेडीकल बंद

मेडिकल संघटनेचा सरकारला इशारा
लसीकरण करा, नाहीतर मेडीकल बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) - जीव धोक्यात घालून मेडिकल मालक, कर्मचारी 24 तास सेवा देताहेत. कोरोना योध्दामध्ये समावेश न झाल्याने मेडिकलवाले लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. आता प्राधान्याने मेडिकल मालक, कर्मचार्‍यांचे लसीकरण करावे, अन्यथा दुकाने बंद करून लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊ, असा इशारा अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनने सरकारला दिला आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरण करताना केंद्र व राज्य सरकारने औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल शासनाने घेतली नाही. सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर नाईलाजास्तव कठोर निर्णय घेत संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन औषध विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या इशार्‍यास अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चेतनकुमार कर्डिले व सचिव राजेंद्र बलदोटा, खजिनदार संजय वाव्हळ यांनी पत्रक काढून पाठींबा दिला आहे.

औषध विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड पेशंट अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी जवळुन येत असल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाला बळी पडले असून, 1000 च्या जवळपास कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. तरीही केंद्र व राज्य सरकारने कोविड योध्दा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही याची खंत सर्व औषधी विक्रेते व्यक्त करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com