तलावात जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट, हजारो मासे मृत
कर्जत (प्रतिनिधी)
राक्षस वाडी येथील तलावामध्ये अज्ञात व्यक्तीने चक्क पाण्यात जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट घडवून आणला. यामुळे तलावातील हजारो माशांना जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे. या घटनेने पर्यावरण प्रेमीमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
तालुक्यातील राक्षस वाडी पाझर तलाव आहे. हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या तलावांमध्ये सध्या पाणी असून मोठ्या प्रमाणामध्ये मासे आणि इतर जलचर प्राणी, पक्षी या पाण्यामध्ये आहेत. अज्ञात व्यक्तीने या तलावातील पाण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या वापरून स्फोट केला. यामुळे या तलावामध्ये असणारे हजारो मासे, तसेच जलचर मृत्युमुखी पडले आहेत. तलावाच्या पाण्यावर आणि पाण्याबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये हजारो मासे मरून पडलेले विदारक चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात नुकसान याठिकाणी करण्यात आली असून आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या ताब्यामध्ये आहे. या तलावांमध्ये पाण्यामध्ये स्फोट घेण्यासाठी त्या व्यक्तीने पूर्वपरवानगी घेतली का आणि घेतली नसेल तर हजारो जलचर प्राण्यांच्या नुकसानीस जबाबदार असणार्या त्या व्यक्तीवर पाटबंधारे विभाग संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.