हिंदू धर्माला बदनाम करण्याचे थांबवा - गायकर
सार्वमत

हिंदू धर्माला बदनाम करण्याचे थांबवा - गायकर

अन्यथा रस्त्यावर उतरू

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

हिंदू धर्माचार्यांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही. त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजात हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणार्‍या साधुसंतांना त्रास देण्याचे षडयंत्र काही मंडळींनी चालवले आहे. अशा प्रवृत्तीचा बिमोड केल्या शिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही.

पुरोगाम्यांमध्ये दम असेल तर त्यांनी इतर धर्मातील अनिष्ठ रूढी व परंपरा या विरुद्ध कार्यवाही करण्याची हिम्मत दाखवावी, किवा हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी दिला.

गुरुवारी शंकर गायकर यांनी ओझर येथे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या निवास्थानी भेट दिली व सुमारे तासभर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी अजित महाराज दिघे, प्रदीप भाटे, सोमनाथ महाराज भोर, किरण शेटे, कुलदीप नेवासकर, संकेत आरोटे आदी उपस्थित होते.

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदोरीकर महाराजांना ओळखले जाते. अनोख्या व रोखठोक शैलीमुळे इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

इंदोरीकर महाराजांनी याप्रकरणी माफी मागून खुलासाही केला होता. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी व विविध सामाजिक संघटना इंदोरीकर महाराज यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत.

आता संपूर्ण देशभर पसरलेल्या व आक्रमक हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. या पुढील लढाई हिंदुत्व वादी संघटना विरुद्ध पुरोगामी अशी रंगण्याची चिन्हे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com