गायकरांसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडले
सार्वमत

गायकरांसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडले

गायींसाठी दीड लाखांपर्यंत कर्ज, पिचड हेच निळवंडे धरणाचे जनक - कर्डिले

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

सीताराम पाटील गायकर यांच्या सारख्या अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे. म्हणून मी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीतून त्यावेळी माघार घेतली. ज्येष्ठनेते मधुकरराव पिचड व ना. बाळासाहेब थोरात यांनी गायकर यांची निवड केली असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मंत्री व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केला.

शेतकरी, साखर कारखानदारी, दूध उत्पादक यांच्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेऊन गायकर यांनी अध्यक्षपदी झालेली आपली निवड सार्थ ठरवली आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तसेच खाजगी सावकारी मोडित काढण्यासाठी जिल्हा बँकेचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देणे, ज्यांच्या सातबारा उतार्‍यावर वर्ग 2 असा उल्लेख आहे अशाही शेतकर्‍यांना कर्ज देणे, मध्यम मुदत कर्ज थकले असले तरी त्याला नव्याने पीक कर्ज देणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर, ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, व्हा. चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक बाजीराव पाटील खेमनर, संचालक व माजी आमदार वैैैभवराव पिचड, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांचा अगस्ति कारखाना, अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अकोले नगरपंचायत यांच्यावतीने अगस्ति कारखाना सभागृहात सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, जि.प.चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, माजी उपाध्यक्ष जि. प. सिताराम देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, जनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भाऊपाटील नवले, अगस्ति पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर, बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ति कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, कार्यकारी संचालक भास्करराव घुले आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याचा आज सत्कार होतोय यामुळे मला आज उर्जा मिळाली. शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने उभे करण्याचे काम बँकेने केले. शेतकरी अडचणीत आहे. म्हणुनच शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला. कारखान्याबरोबरच सर्वसामान्यांना रिबेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यम मुदत कर्जाला हप्ते पाडून देण्याचा निर्णय बँकेने घ्यावा.

शेतकर्‍याला मदत झाली पाहीजे हाच खरा उद्देश आहे. थकीत कर्जदाराला एक रकमी परतफेडचा निर्णय घ्यावा. बँकेत कधी राजकारण किंवा पक्षपार्टी आड आली नाही. जिल्ह्यातील एकही कारखाना राज्य सहकारी बँकेचे कर्ज घेत नाही. सर्व कारखाने आता जिल्हा बँकेकडे आहे. केंद्राने प्रति गाय दहा हजारांचा निर्णय घेतला. पण बँकेने पंधरा हजारांचा निर्णय घेऊन दहा गायींसाठी दीड लाखांचा निर्णय घेतला आहे. निळवंड्याच्याबाबतीत कोणी कितीही गप्पा मारीत असतील तर मधुकरराव पिचड हेच खरे निळवंड्याचे जनक आहेत.

मधुकरराव पिचड म्हणाले, जिल्हा बँकेने ऐतिहासीक निर्णय घेतला. पहिली बँक फक्त रिबेट वाटणारी बँक म्हणून बँकेची प्रतिमा होती. पण आज शेतकर्‍याला उभे करण्यासाठी तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय आहे. श्रेय मिळविण्यासाठी मी कधीच काम केले नाही. निळवंडे, पिंपळगाव खांडसारखी धरणे निर्माण केली. अगस्ति कारखान्याची निर्मिती केली. जे केले ते तरी मान्य करा. जिल्हा बँकेबरोबरच पतसंस्थेच्या कर्जावरील व्याज माफीचा निर्णय झाला पाहीजे. माझे आयुष्य निर्मितीसाठी आहे. यापुढचे आयुष्यही निर्मितीसाठीच असेल, कर्डिलेंनी अगस्ति कारखान्यासाठी योगदान दिले ते महत्त्वाचे आहे.

सिताराम गायकर म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शिवाजी कर्डिले यांनी अर्ज भरला नाही. त्यांची आणि माझी मैत्री यामुळे झाली. अनेक दिग्गजांनी ही बँक चालवलेली. पण माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला मधुकरराव पिचड यांच्यामुळेच ही संधी मिळाली. याच संधीचा फायदा घेत शेतकरी हितासाठी आपण अनेक निर्णय घेतले. शून्य टक्के व्याज दर व वर्ग दोनच्या जमिनीला कर्ज देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, रामदास वाघ, परबतराव नाईकवाडी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन मुख्य लेखापाल एकनाथराव शेळके यांनी केले.आभार संचालक महेशराव नवले यांनी मानले.

याप्रसंगी अगस्तिचे ज्येष्ठ संचालक कचरू शेटे, मिनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, अशोकराव आरोटे, बाळासाहेब देशमुख, सुनिल दातीर, राजेंद्र डावरे, रामनाथ वाकचौरे, बाळासाहेब ताजणे, अमृतसागरचे संचालक शरद चौधरी, प्रविण धुमाळ, विठ्ठलराव डुंबरे, सोपान मांडे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठलराव चासकर, कार्यकारी संचालक सुजीत खिलारी, नगरसेवक परशुराम शेळके, सचिन शेटे, प्रकाश नाईकवाडी, बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, संचालक रावसाहेब वाळुंज, दिलावर शेख, बाळासाहेब सावंत, सुधीर शेळके, विजय लहामगे, भाऊसाहेब कासार, सचिव अरुण आभाळे, देखरेख संघाचे चेअरमन भाऊसाहेब काळे, व्हा.चेअरमन बाबासाहेब वाकचौरे, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब बराते, जिल्हा बँकेचे कॉलेज रोड शाखाधीकारी शांताराम धुमाळ, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलीक, म्हाळादेवीचे सरपंच प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, बाळासाहेब कुमकर, भाऊसाहेब गोर्डे आदी उपस्थित होते.

तालुक्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे बोलले जात असताना अगस्ति कारखाना, निळवंडे व पिंपळगाव खांड धरणे हे कुणी निर्माण केले? असा सवाल राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केला.

माजी आमदार मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यामुळे मी निर्णय घेताना कधीच डगमगलो नाही. त्यांनी खंबीर साथ मला दिल्यानेच मी हे काही धाडसी निर्णय घेऊ शकलो. चहावाले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. तर दुधवाले मंत्री होऊ शकतात हे कर्डिलेंनी दाखवून दिले असल्याचे सिताराम गायकर म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com