गायत्रीच्या खर्‍या मारेकर्‍यांना कडक शासन करण्यासाठी पुढाकार घेणार

रुपाली चाकणकर ; गायत्रीच्या नातेवाईकांनी दिले निवेदन
गायत्रीच्या खर्‍या मारेकर्‍यांना कडक शासन करण्यासाठी पुढाकार घेणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

कोपरगाव तालुक्यातील मयत गायत्री त्रिभुवन या विवाहित महिलेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक त्रास देत, भूतबाधा झाली असल्याचे सांगून तिचा बळी दिला. यामुळे तरुण विवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला. संबंधित आरोपीच्या विरोधात कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींना कडक शासन व्हावे म्हणून महाराष्ट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना शिर्डीत निवेदन देण्यात आले. आपण स्वतः याप्रश्नी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले.

आजच्या आधुनिक युगात मांत्रिकाचा वापर झाल्याच्या संशयावरून एका तरुण विवाहितेचा बळी दिला जातो. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या सासरच्या सर्व लोकांना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी आपला तपास योग्य गतीने करावा. सदर खटला अति जलद न्यायालयात चालविण्यात यावा. मांत्रिकाच्या आज्ञेवरून सदर विवाहितेचा बळी गेला असल्याने मांत्रिकाला सहआरोपी करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सौ. चाकणकर यांनी सदर निवेदनाची त्वरित दखल घेऊन शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी, कोपरगाव पोलीस निरीक्षक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सदर घटनेचा तपास त्वरित लावा. मोकाट असलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, असे आदेश तात्काळ दिले तर आपण सुद्धा एक महिला असून महिलेच्या दुःखाच्या वेदनेची तर ज्या घरातील अशा पद्धतीने मुलगी बळी जाते त्या माता पित्यांच्या डोळ्यातील अश्रूंची आपल्याला जाण असल्याने मयत गायत्रीच्या प्रकरणात महाराष्ट्र महिला आयोगाच्या मार्फत सखोल चौकशी करून संबधित आरोपींना कडक शासन करण्यासाठी पुढाकार घेऊन मयत गायत्री त्रिभुवन यांच्या नातेवाईकांना नक्कीच न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले

यावेळी मयत गायत्रीचे नातेवाईक नवनाथ राक्षे, दगडू राक्षे, बाळासाहेब राक्षे, सचिन बोर्‍हाडे, विकास भडकवाड, विजय राक्षे, राहुल राक्षे, अशोक भोंडगे, वसत भोंडगे, एकनाथ बलसाने, विलास बोर्‍हाडे, मयत गायत्रीचे वडील बाळासाहेब खरात, आई नंदा खरात, भाऊ अविनाश खरात, सागर खरात आदी नातेवाईक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.