
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना गायत्री कंपनीकडे काम करणार्या व्यावसायिकांचे थकीत बिले अजून मिळालेली नाही. व्यावसायिकांचे कोट्यवधी देणे थकवून गायत्री कंपनीने गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून पैसे काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे.
कोपरगाव परिसरातील समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी गायत्री कंपनीला ठेका मिळाला होता. गायत्री कंपनीनेही चांदेकसारे परिसरात कार्यालय थाटून अनेक व्यवसायिकांना आपल्याकडे आकर्षित करून समृद्धी महामार्गाचे काम करण्यास भाग पाडले. परिसरातील व्यावसायिक व शेतकर्यांनी आपल्या जमिनी विकून समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी, क्रेन आदी वस्तू बँक, फायनान्स, पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून घेतल्या. सुरुवातीला एक-दीड वर्ष गायत्री कंपनीने या व्यवसायिकांना मिळालेल्या कामाचा मोबदला दिला.
मात्र नंतर या व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये थकवले. आपले थकलेले पैसे काढण्यासाठी व्यावसायिकांनी वेळोवेळी कंपनीचे गेट बंद आंदोलन, उपोषण आंदोलन केले. गायत्री कंपनीचे काम अपूर्ण असल्यामुळे वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे व्यवसायिकांच्या पदरात काही प्रमाणात पैसे मिळाले. मात्र आता गायत्री कंपनीकडूनही दुसर्या कंपनीकडे हे काम गेल्यामुळे या कंपनीने परिसरातील व्यवसायिकांचे पैसे थकविण्यास सुरुवात केली.
कोट्यवधी रुपये या कंपनीने सध्या थकवले आहेत. कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे यादृष्टीने त्यांनी एकत्र येत कंपनीचे गेट बंद करून प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे.
गायत्री कंपनीचे सर्व सामान गेट बंद करून ठेवले आहे. नाशिक येथे एमएसआरडीसी कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतरही कंपनी व्यावसायिकांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते. व्यावसायिकांनी गायत्री कंपनीला कर्ज काढून साधने उपलब्ध करून दिली आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून संबंधित व्यावसायिकांचे पैसे गायत्री कंपनीकडून मिळवून द्यावेत, अशी मागणी सध्या व्यवसायिकांमधून होते आहे. व्यवसायिकांनी याबाबत कोपरगाव तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे.