गावठी कट्टे निर्मितीवर तोफखाना पोलिसांचा घाव

थेट मध्यप्रदेशात कारवाई || मुद्देमालासह एक अटकेत
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मध्यप्रदेशातील खुरमाबाद (ता. सेंधवा, जि. बडवाणी) येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला गावठी कट्टे बनविण्याचा उद्योग तोफखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. त्या शेडमध्ये तोफखाना पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने धाड टाकून गावठी कट्ट्याची निर्मिती करताना एकाला रंगेहाथ पकडले. दरम्यान जे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जमले नाही ते तोफखाना पोलिसांनी करून दाखविले, अशीच चर्चा पोलीस दलात सुरू झाली आहे.

पोलिसांनी जमालसिंग अजितसिंग चावला (वय 28 रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याला दाखल गुन्ह्यात अटक केेली आहे. त्याच्याकडून अर्धवट बनवलेला कट्टा, इलेक्ट्रिक ग्राईन्डर मशीन, तीन अर्धवट बनवलेली काडतुसे, एक लोखंडी चिमटा (पक्कड), ब्लेड, कानस, स्प्रिंग, हँन्ड ग्राईंन्डर असा सात हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील तारकपूर बस स्थानक परिसरात कारवाई केली होती.

मध्यप्रदेश येथून तीन गावठी कट्टे व नऊ काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला (वय 31 रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि. बडवाणी) याला ताब्यात घेत अटक केली होती. सदरचे कट्टे टिकल्या उर्फ शेख शहनवाज महमंद खजा (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, हल्ली रा. पोपटवाडी, केडगाव) याला विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली त्याने दिली होती. दरम्यान 15 दिवसांपूर्वीच टिकल्याला दोन कट्टे व सहा काडतुसे दिली असल्याचेही त्याने कबूल केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. प्रथम खोटे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. कोठडीत असताना त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जमालसिंग अजितसिंग चावला (वय 28 रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याच्याकडून कट्टे विकत घेतले असल्याची कबुली दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, संदीप गिर्‍हे, सतीश त्रिभुवन, सतीश शिरसाठ, सुरज वाबळे यांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने जमालसिंग चावला याला कट्टे बनविताना रंगेहाथ पकडून नगरला आणले. त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com