श्रीरामपुरात पोलिसांकडून गावठी कट्टा, काडतूस व तलवार हस्तगत

दोघा जणांना अटक, शहर पोलिसांची कामगिरी
श्रीरामपुरात पोलिसांकडून गावठी कट्टा, काडतूस व तलवार हस्तगत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत शहरातून एक गावठी कट्टा व काडतूस तसेच धारदार तलवार अशी हत्यारे जप्त केली. याप्रकरणी शहरातील वॉर्ड नं. 1 व वॉर्ड नं. 2 मधील दोन तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी शहर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यांतर पोलिसांच्या पथकाने पहिल्या घटनेत वॉर्ड नं. 1 गोंधवणी रोड, लबडे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर रात्री 11.50 च्या सुमारास हातात धारदार तलवार घेऊन आरडाओरड करताना इरफान सय्यद याला पकडले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून इरफान मेउद्दीन सय्यद (वय 19, रा. मिल्लतनगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुरनं. 868 दाखल करण्यात आला. पोलीस नाईक पवार पुढील तपास करीत आहेत.

तर दुसर्‍या घटनेत श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 सुलताननगर भागात रात्री 12.10 च्या सुमारास पोलिसांनी जोएब शेख याच्याजवळून सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यावर 7.62 असे छापलेले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पंकज विजय गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून जोएब अन्सार शेख (वय 28, रा. काझीबाबा रोड, वार्ड नं. 2 श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुरनं. 869 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विठ्ठल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी दोन्ही घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या घटनेतील इरफान सय्यद व जोएब शेख या दोघांनाही अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com