दोघांना गावठी कट्टा व काडतुसांसह पकडले

एलसीबीची राहुरी बसस्टॅण्ड परिसरात कारवाई
दोघांना गावठी कट्टा व काडतुसांसह पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बेकायदेशिररित्या जवळ बाळगणार्‍या दोघांना राहुरी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. नवनाथ साहेबराव गोर्डे (वय 34 रा. पोहेगाव ता. कोपरगाव), समाधान बाबासाहेब चव्हाण (वय 25 रा. कोपरगाव बेट ता. कोपरगाव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

दोनजण गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी राहुरी परिसरात अवैध धंद्यावर कारवाईसाठी गस्त करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, विजय ठोंबरे, सागर ससाणे व रोहित येमुल यांच्या पथकाने राहुरी बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com