तीन गावठी कट्ट्यांसह दोघे अटकेत

एलसीबीची सावेडी उपनगरात कारवाई
तीन गावठी कट्ट्यांसह दोघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरात अवैध गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सागर एकनाथ आवसरे (वय 26 रा. गाडेकर चौक, पत्राचाळ, निर्मलनगर), मनोज लक्ष्मण झगरे, (वय 31 रा. गुंडू गोडावून मागे, तपोवन रोड) असे जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेतला असता तो मात्र मिळून आला नाही. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, तपोवन परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी अवसारे व झगरे हे येणार आहेत.

त्यानुसार तत्काळ निरीक्षक कटके यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहायक निरीक्षक वारूळे यांनी अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापू फोलाणे, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, भीमराज खर्से, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांना सोबत घेऊन वेशांतर करून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने तपोवन रोड येथे जाऊन सापळा लावला.

दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात अंमलदार पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com