गावठी कट्ट्यासह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

एलसीबीची नगरमध्ये कारवाई
गावठी कट्ट्यासह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावठी कट्ट्यासह दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी नगर शहरातील वारूळवाडी रोड, गजराजनगर येथे अटक केली. इकबाल ऊर्फ सोनू सिकंदर शेख, सोहेल सय्यद अब्दुलगणी (दोघे रा. गजराजनगर, नगर) असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंंत काडतुस असा 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी हा गावठी कट्टा दीपक कपीले (रा. शेवगाव) यांच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इकबाल शेख हा वारूळवाडी रोडवर गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मन्सूर सय्यद, शंकर चौधरी, संदीप पवार, रवी सोनटक्के, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, आकाश काळे, बबन बेरड यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या.

पथकाने वारूळवाडी रोडवर इकबाल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता सदरचा गावठी कट्टा व काडतूस सोहेल अब्दुलगणी याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी सोहेल याला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी कट्टा, काडतूस जप्त केले आहे. इकबाल शेख विरोधात श्रीरामपूर, शेवगाव व कोतवाली पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. तर सोहेल अब्दुलगणी विरोधात भिंगार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती निरीक्षक कटके यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com