गावठाण हद्द कायम करा; बकुपिंपळगाव ग्रामस्थांचे उपोषण सुरु

गावठाण हद्द कायम करा; बकुपिंपळगाव ग्रामस्थांचे उपोषण सुरु

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

गावठाण जागेची स्मशानभूमी व खेळाचे मैदान जनावरे उभी राहण्याची जागा, खळे वाडगे इत्यादी जागेची चौकशी करून गावठाण हद्द कायम करा या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील बकुपिंपळगाव गावठाणात राहत असलेल्या रहिवाशांनी सोमवार 30 ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

माजी सरपंच खंडू थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ दादा माळी, एकनाथ मोरे, पोपट जांभळकर, विजय दळवी यांच्यासह गावठाणात राहणारे शेकडो रहिवासी आपल्या मुलाबाळांसह उपोषणात सहभागी झाले आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की आम्ही गावठाणात रहात असल्यामुळे आम्हाला शासकिय योजनेचा लाभ ग्रामपंचायतीकडून मिळत नाही. आलेल्या शासकिय अनुदान व शासकिय कामे करण्यासाठी गावठाण हद्दीतील खळेवाडगे, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, गाव अंतर्गत रस्ते त्याप्रमाणे दलित वस्ती अतंर्गत असलेल्या योजनेचा लाभ जागेअभावी घेता येत नाही. घरकुल सारख्या योजनेचा वैयक्तीक लाभ मागासवर्गाना घेता येत नाही

गेले तीन वर्षांपासून लोकसंख्येच्या तुलनेत खुपच कमी जागेमुळे अवघी 6 ते 7 घरकुले मंजूर झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार गावठाणाची जागा कमी पडत आहे. तेव्हा वाढीव जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजूर करावा नागरी सुविधासाठी कमी पडलेली जागा जी शासनाने राखीव ठेवलेली जागा ती ग्रामपंचायतीस वर्ग करण्यात यावी व भूसंपादित खात्याने नविन गावठाणसाठी सात बारा नुसार जी शेतजमिनीची जागा नवीन गावठाणसाठी संपादीत केलेली आहे ती संपूर्ण शेत जागा ही ग्रामपंचायत हद्दीत घेऊन रेकॉर्डला नोंद करून घ्यावी व गावातील नागरिक सुविधेसाठी उपलब्ध करून द्यावी.

काही कारणास्तव काही जागा दप्तरी नोंद न लागल्यामुळे मूळ मालक मालकी हक्क बजावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय ती ग्रामपंचायत हक्क कायम करण्यात यावे असेही निवेदनात स्पष्ट केले आहे. याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार, आमदार शंकरराव गडाख यांना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या असून संबंधित खात्याने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आमरण उपोषण सुरूच ठेऊ, असा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनात गावठाणात रहाणार्‍या शेकडो रहिवाशांच्या सह्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com