गावठी कट्टयांचा खेळ : ‘गेम’ करायला सहज मिळतोय गावठी कट्टा

एजंटच्या माध्यमातून कट्ट्यांची सर्रास विक्री
गावठी कट्टयांचा खेळ : ‘गेम’ करायला सहज मिळतोय गावठी कट्टा

अहमदनगर |सचिन दसपुते| Ahmednagar

जिल्ह्यातील गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट शोधण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक करत आहे. याच पथकाने काही दिवसांपूर्वी कोल्हार परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून तीन कट्टे व सहा काडतुसे जप्त केली. रवींद्र भाऊसाहेब थोरात व बाळासाहेब भिमराज थोरात अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी कट्टे कुठून घेतले आणि त्याचा वापर कशासाठी करायचा होता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एलसीबीने कारवाई करून सदरचे आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लबडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. त्यांनी एलसीबीच्या मदतीने कट्टे देणारा शोधून काढला. संजय उर्फ भैय्या बापू पवार (रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. तो रवींद्र थोरात याला कट्टे विक्री करत होता. रवींद्र थोरात कट्टे विक्रीत एजंटचे काम करतो. त्याने एक कट्टा बाळासाहेब थोरात याला विक्री केला. कट्टा विक्री केला परंतु काडतुस मात्र दिले नाही आणि कट्टे खरेदी-विक्री व्यवहाराचे बिंग फुटले.

बाळासाहेबाने एका जवळच्या व्यक्तीचा गेम वाजविण्यासाठी रवींद्रकडून कट्टा घेतला होता. पैसे देऊन कट्टा खरेदी केला मात्र काडतुस दिले नाही, ते नंतर देण्याची बोली झाली. रवींद्रने बाळासाहेबला काडतुस दिले नाही यामुळे बाळासाहेब थोरात याचे काम अडून पडले. त्यांच्यात वाद झाले आणि याची कुणकुण एलसीबीला लागली. एलसीबीच्या पथकाने गुप्त माहिती काढून कट्टे खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. एलसीबीला पक्की खबर मिळाली आणि त्यांनी रवींद्रला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन कट्टे आणि बाळासाहेब थोरातला विक्री केलेला एक कट्टा अशी तीन कट्टे जप्त केली. दोघांना अटक केली.

दरम्यान गावठी कट्टे विक्री करण्यासाठी भैय्या पवार याने एजंटला हाताला धरून विक्री सुरू केली. तो कधीपासून विक्री करतो, त्याला कट्टे कुठून उपलब्ध होतात, त्याचे आणखी किती एजंट आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

खबर्‍यांचे नेटवर्क तगडे

स्थानिक गुन्हे शाखा गावठी कट्टे शोधण्याचे काम करत आहे. त्यांचे नेटवर्कही तगडे आहे. या नेटवर्कचा वापर करून जिल्ह्यातील गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट समोर आणण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते. अशाही परिस्थितीत पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रणजित जाधव, संदीप चव्हाण, राहुल सोळुंखे, रविकिरण सोनटक्के हे यासाठी काम करत आहेत.

गेम करायला गेला अन् अडकला

वैतागलेला बाळासाहेब थोरात याला एकाचा गेम करायचा होता. त्याने रवींद्रकडून कट्टा विकत घेतला. पैसे दिले परंतु त्याला काडतुस मिळाले नाही. त्याने काडतुससाठी रवींद्रकडे तगादा लावला. काडतुस मिळत नसल्याने त्यांच्यात वाद झाले याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यांनी लागलीच रवींद्रसह बाळासाहेबला ताब्यात घेतले. सदरचे कट्टे ताब्यात घेतल्यानंतर ते शनिशिंगणापूर येथून आल्याची माहिती समोर आली. तेथील भैय्या पवार गजाआड केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com