
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नान्नज (ता. जामखेड) येथुन एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे बेकायदशिररित्या कब्जात बाळगणार्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. हरिश उर्फ हरिनाथ सुबराव बिरंगळ (वय 42 रा. सोनेगाव ता. जामखेड) व महेंद्र अभिमान मोहळकर (वय 38 रा. नान्नज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे विरूध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून शोध सुरू असताना निरीक्षक कटके यांना माहिती मिळाली की, गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जवळ बाळगणारे दोन इसम नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कूल येथे येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यांनी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कळवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
त्यानुसार उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार विश्वास बेरड, बापूसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, भीमराज खर्से, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जामखेड-नान्नज रोडवरील, नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कूल येथे जाऊन वेशांतर करून सापळा लावून थांबलेले असताना थोड्याच वेळात बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन इसम संशयितरित्या फिरताना दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. अंमलदार बेरड यांच्या फिर्यादीवरून दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र अभिमान मोहळकर हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरूध्द यापूर्वी नगर जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर स्वरूपाची दुखापत करणे असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच हरीष उर्फ हरिनाथ सुबराव बिरगंळ विरोधात गंभीर स्वरूपाचा एक गुन्हा दाखल आहे.