
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी पोलिसांनी शिर्डी जवळील सावळीविहीर नजीकच्या परीसरात संशयास्पद फिरत असलेल्या एका तरुणाला देशी बनावटीच्या पिस्तुल एक जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे.
सोमवार दि. 22 मे रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण एका दूध डेअरी प्रकल्पाजवळ देशी बनावटीची पिस्तुल बाळगून आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सरकारी पंच व पोलीस पथकासह खासगी वाहनाने पहाटे चार वाजता के के मिल्क येथे जात काही अंतरावर वाहन थांबवून अंधारात बारकाईने पाहणी केली असता एक तरुण संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला.
हा तोच तरुण असल्याची पंच आणि पथकाची खात्री होताच त्या तरुणास पकडून त्याची झडती घेतली असता संशयित तरुण योगेश कैलास खरात (वय 23) रा. भोजडे चौकी, कोपरगाव याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याचा पंचनामा करून पिस्तुल व काडतूस जप्त करण्यात आले. पोलीस कर्मचारी नितीन शेलार यांच्या फिर्यादीवरून कैलास खरात यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 403/2023 शस्त्र अधिनियम 1959 कलम 25,3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तो कट्टा आरोपीने कोणत्या उद्देशाने आणला होता त्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न होईल. आरोपीस राहाता येथील न्यायालयात हजर केले असता 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तरुणाने गावठी कट्टा कोठुन खरेदी केला तो कशासाठी जवळ बाळगत होता त्याच्यावर या आधी काही गुन्हे दाखल आहेत का?, तो कोणाची वाट बघत होता, त्याबरोबरच तो कोणाकोणाच्या सहवासात होता याची देखील माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा प्रयत्न सुरू आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेलार, पोलीस नाईक संतोष गोमसाळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे यांनी सहभाग घेतला.