
पुणे |प्रतिनिधी| Pune
पुण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ गौतमी पाटीलचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर व्हायरल करणार्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) याच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.
या दोघांनी गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करुन तो इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता. याप्रकरणी गौतमीने 25 फेब्रुवारीला विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार या आरोपींवर भादवि कलम 354 (क), आयटी ऍक्ट 66 (सी), 66 (ई), (ए67) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान विमानतळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून गौतमीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणार्या व त्यावरून तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्हिडीओ व्हायरल करणार्यांची कानउघडणी केली होती. तुमचं काही जात नाही पण मला लोकं बोलतात, तुमच्याही घरी, आई- बहिणी असतील ना, मग हे असं काम करताना त्यांचा विचार मनात आला नाही का? असा प्रश्न गौतमीने केला होता. शिवाय हा व्हिडीओ आपण सर्वात आधी आपल्या आईला पाठवून तिला कल्पना दिली होती हे म्हणताना गौतमीचे डोळे पाणावले होते.