आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

मंत्री गडाखांच्या अडचणीत भर
आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांच्या मागणी अर्जामुळे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर पडली आहे.

या आत्महत्या प्रकरणात नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक ऋषिकेश शेटे यांनी अहमदनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शंकरराव यशवंतराव गडाख, सुनिता शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी खासगी फिर्याद दाखल केली आहे. यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. 23 डिसेंबर 21 रोजी न्यायालयाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकार्‍यांना अहवाल मागितला होता. स्व. गौरी प्रशांत गडाख यांच्या मृत्यूप्रकरणी शंकरराव व सुनिता गडाख यांच्यावर खुनाचा कट केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी शेटे यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी 18 फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. त्यात या घटनेचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनकडे न ठेवता सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत अहमदनगर न्यायालयात 25 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. दरम्यान मंत्री गडाख व त्यांचे कुटुंब चौकशीच्या चक्रव्यूहात अडकण्याची चिन्हे आहेत. गडाख विरोधकांनी एकजूट करत त्यांना राजकीयद़ृष्ट्या घेरण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com