डॉ. शेखर यांच्या पोलीस पथकांचे नगर शहरात छापे गॅस रिफिलिंग

दोन ठिकाणी गॅस रिफिलिंगमधील सात जणांविरोधात गुन्हा दाखल
डॉ. शेखर यांच्या पोलीस पथकांचे नगर शहरात छापे गॅस रिफिलिंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने शहरातील सावेडी परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे टाकले. यात सात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत 27 गॅस टाक्या, रिक्षा व साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष पथकाचे पोलिस हवालदार शकील अहमद शेख यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब रोहोम, अन्नधान्य पुरवठा निरीक्षक एन. एम. पाईकराव, पथकातील एएसआय रवींद्र शिलावट, प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, सुरेश टोंगारे यांनी ही कारवाई केली. भिगारदिवे मळा परिसरात शाहरुख निसार शेख, तसेच प्रभात बेकरीसमोर, हॉटेल जय आनंदच्या पाठीमागे, पवन भिंगारदिवे हे बेकायदेशीर गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

पथकाने भिंगारदिवे मळा परिसरातील सेंटरवर छापा टाकला असता एमएच 16 सीई 1063 या रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून तीन व्यक्ती मशीनच्या सहाय्याने रिक्षाच्या टाकीमध्ये गॅस भरत असल्याचे व आतमध्ये काही गॅस सिलेंडर आढळून आले. पथकाने सेंटर चालक शाहरूख निसार शेख (वय 26, रा. भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड), रिक्षा चालक राजू नारायण सातव (वय 53, रा. पाईपलाईन हडको) व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले. तसेच 10 सिलेंडर, साहित्य व रिक्षा असा मुद्देमाल ताब्यात घेतला.

त्यानंतर हॉटेल जय आनंदच्या पाठीमागे सुरू असलेल्या गॅस रीफिलींग सेंटरवर छापा टाकला. तेथे एमएच 16 बीसी 0413 या रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून चार व्यक्ती मशीनच्या सहाय्याने रिक्षाच्या टाकीमध्ये गॅस भरत असल्याचे व मोकळ्या जागेत काही अवैध सिलेंडर आढळून आले. पथकाने तेथून पवन शरद भिंगारदिवे (वय 25, रा. सावेडी), जयंत छगन भिंगारदिवे (वय 38, रा. सावेडी गाव), अस्लम शेख (वय 23 रा. दौला वडगाव ता. आष्टी, जि. बिड), दिनेश परशराम गायकवाड (वय 46, रा. नालेगाव, दातरंगे मळा) यांना ताब्यात घेतले. तसेच 17 गॅस टाक्या, साहित्य व रिक्षा पथकाने जप्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com