कचरा डेपो परिसरात प्रदूषणाचा अहवाल द्या - हरित लवाद
सार्वमत

कचरा डेपो परिसरात प्रदूषणाचा अहवाल द्या - हरित लवाद

अहमदनगर महापालिकेची सुनावणीला दांडी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

बुरूडगाव रोडवरील कचरा डेपो परिसरात किती प्रदूषण झाले याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, असे आदेश हरित लवादाने गुरुवारी दिले. महापालिका व प्रदूषण महामंडळाने संयुक्तपणे ही पाहणी करून 2 ऑगस्टला अहवाल द्यावा, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान कालच्या सुनावणीला महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दांडी मारली.

बुरूडगाव येथील कचरा डेपोमुळे शेतकर्‍यांचे प्रदूषणाने नुकसान झाले असा दावा करत नुकसानभरपाईसाठी शेतकरी कोर्टात गेले आहेत. राधाकिसन कुलट यांनी लवादाकडे याचिका दाखल केली आहे. गत 5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीवेळी महापालिकेला प्रकल्प उभारणीचे ‘टाईम लिमिट’ घालून देण्यात आले होते.

त्याचा अहवाल सादर करण्याचे लवादाने प्रदूषण महामंडळाला सांगितले. प्रदूषण महामंडळाने काल लवादासमोर महापालिकेचे बायोमिथेन, बायोमायनिंग, विद्युत दाहिनी, प्रोसेसिंग हे प्रकल्प अर्धवट असून टाईम लिमिटनुसार काम सुरू नसल्याचा अहवाल मांडला. महापालिकेचे वकील व अधिकारी या सुनावणीला उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वकिलांनी महापालिकेला किती गांभीर्य आहे याची दखल घ्यावी अशी विनंती केली.

महापालिकेला दंड केला. पाच कोटीची बँक गॅरंटी जप्त केली तरीही महापालिका प्रकल्प उभारणीचे काम करीत नाही असे म्हणत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. महापालिकेला हा प्रकल्प उभा करायचा की नाही याबाबत प्रश्न उपस्थित करत लवादाने डेपोमुळे किती नुकसान झाले याचा अहवाल मागविला. हा अहवाल महापालिका व प्रदूषण महामंडळाने एकत्रित पाहणी करून द्यावा असे आदेशात म्हटले आहे. अहवाल आल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा अंदाज येईल. त्यावर 2 ऑगस्ट रोजी होणार्‍या सुनावणीवेळी निर्णय घेतला जाणार असल्याचे कोर्टाने सांगितले.

2002 सालात महापालिकेचा कचरा डेपो बुरूडगाव रोड परिसरात स्थलांतरित झाला. तेव्हापासून शेतकर्‍यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. कचरा डेपोत प्रक्रिया प्रकल्प नसल्याने प्रदूषण होत आहे, अशी शेतकर्‍यांची तक्रार आहे. आता लवादाने शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. 2002 पासून प्रदूषणाने किती नुकसान झाले याचा अहवाल आता महापालिका व प्रदूषण महामंडळ देणार आहे. 18 वर्षांपासूनच अहवाल 17 दिवसांत तयार करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

Deshdoot
www.deshdoot.com