पोलीस बंदोबस्तात कुलूप तोडून कचरा डेपो केला खुला

मनपाची कार्यवाही || बुरूडगावकरांना लेखी आश्वासन
पोलीस बंदोबस्तात कुलूप तोडून कचरा डेपो केला खुला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुरूडगाव ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा, बुरूडगाव डेपो परिसरातील रस्ते व पथदिव्यांच्या कामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महापालिकेच्या कचरा डेपोला टाळे ठोकले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरात कचरा कोंडी निर्माण झाली होती. गुरूवारी सकाळी महापालिकेने डेपोला लावलेले कुलूप तोडून काम सुरू केले आहे.

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर बुधवारी मनपा आयुक्तांसह अधिकारी व पदाधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली होती. ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशीही चर्चा केली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा ग्रामपंचायत पदाधिकारी व मनपा अधिकारी यांच्यात चर्चा होऊन महापालिकेने लेखी आश्वासन दिले. त्यानंतरही ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेऊन डेपो खुला न केल्यामुळे गुरूवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी पोलीस बंदोबस्तात डेपोला लावलेले कुलूप तोडले व कामाला सुरूवात केली.

महापालिकेने कुलूप तोडल्यानंतर काही ग्रामस्थ व पदाधिकारी तेथे आले होते. मात्र महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांना समजावून सांगत परत पाठवून दिले. दरम्यान, दोन दिवसांपासून गाड्यांमध्ये कचरा भरलेला असल्यामुळे शहरातील कचरा संकलन ठप्प झाले होते. गुरूवारपासून गाड्या खाली करण्यास डेपोमध्ये सुरूवात झाली आहे. शहरात साचलेला कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे.

बुरूडगाव ग्रामस्थांना पाणीपुरवठा, डेपो परिसरातील रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे काही ग्रामस्थांचे समाधान झाले. महापालिकेची मालमत्ता असलेल्या डेपोला कुलूप लावण्याचा अधिकार ग्रामस्थांना नाही. आम्ही तेथे जाऊन कचरा डेपो खुला केला आहे.

- यशवंत डांगे, उपायुक्त, मनपा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com