कचरा डेपोच्या धुराने गुदमरतोय दरेवाडीकरांचा श्वास

कचरा डेपोच्या धुराने गुदमरतोय दरेवाडीकरांचा श्वास

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

दरेवाडी येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोने दरेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.

दोन दिवसांपासून येथील कचरा डेपो पेटला असून त्याच्या धुराने परिसरातील लोक गुदमरत आहेत. वारंवार मागणी करूनही कॅन्टोन्मेंट मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.

दरेवाडी येथे अनेक वर्षांपासून कँटोनमेंट बोर्डाचा (छावणी परिषद) मोठा कचरा डेपो आहे. भिंगारसह छावणी परिषद परिसरातील सर्व कचरा दररोज येथे आणून टाकला जातो. शेकडो टन हा कचरा येथील खुल्या मैदानात कोणतीही प्रक्रिया न करता अस्तावस्त खाली केला जातो. वारामुळे हा कचरा परिसरातील लोकांच्या घरात घुसतो.

अनेकदा कचरा पेटण्याच्या घटनाही घडतात. गेल्या दोन दिवसांपासून येथील कचरा पेटला असून रात्रंदिवस परिसरातील लोकांच्या घरात धुराचे लोट जात आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरात रुग्ण आहेत, लहान मुले आहेत. त्यांना या धुरामुळे श्वास घेणे मुश्कील झाले आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा हा कचरा डेपो इतरत्र हलवण्याबाबत मागणी केली.

मात्र कँटोन्मेंट बोर्डाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. सध्या करोनाच्या काळात नागरिकांना मुख्यता श्वसनाचा त्रास होत असताना, आणि रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत असताना येथे मात्र कचरा पेटवून आहे. तो ऑक्सिजन दूषित करण्याचे काम सर्रास होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com