
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गणपती स्थापना मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तरुणाला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी पोस्टमन कॉलनी, मकासरे हेल्थ क्लब जवळ घडली. प्रमोद दादू पगारे (वय 30 रा. सिव्हिल हाडको, सावेडी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी बुधवारी (दि. 20) तोफखाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक प्रदीप लगंदे, रमेश बरकते, नयन उद्दीन शेख, धनंजय गायकवाड, शुभम शहाणे (सर्व रा. सिव्हिल हाडको, सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास गणपती स्थापना मिरवणूक निघाल्या होत्या.
पोस्टमन कॉलनी येथून एकूण पाच मिरवणुका सुरू होत्या. यामध्ये पगारे यांची महाकाळ प्रतिष्ठान मंडळाची मिरवणूक पाचव्या क्रमांकावर होती. त्याच दरम्यान ऋतिक लगंदे याने माईकवरून पगारे यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पगारे यांना पाच जणांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.