
नेवासा | तालुका प्रतिनिधी
गंगापूर येथील सहकारी साखर कारखाना सोलापूरच्या जयहिंद शुगर्सला १५ वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार सोमवार दि.२० मार्च रोजी झाला आहे. गंगापुर साखर कारखाना सुरु होत असल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या पुढील काळात उस टंचाई सामोरे जावे लागणार आहे.
गंगापूर साखर कारखाना विद्यमान नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संमतीने जयहिंद शुगर्सनी चालवायला घेतला असून, सोमवारी रात्री त्याचा ताबाही देण्यात आला आहे. गंगापूर साखर कारखाना बंद असल्याने, तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असताना व तत्कालीन संचालक मंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या धामधुमीत कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने मे, २०२२ मध्ये चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध केली होती.
मात्र, यापूर्वीच्या प्रक्रियेला न मिळालेला प्रतिसाद व आलेला न्यायालयीन अडथळ्याने प्रक्रिया रखडली होती, शिवाय यात न्यायालयीन अडथळे पार करीत सोलापूरच्या जयहिंद शुगर्सने कारखाना चालविण्यासाठी घेऊन तो चालू करण्यासाठी वेगाने सूत्र फिरविली होती. मात्र, बँक व त्यांच्यातील करारापूर्वीच राज्यात सत्तांतर झाल्याने कराराची प्रक्रिया रखडली होती.
यातच कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने करार होणार नाही, या विचाराने शेतकरी सभासद नाराज झाले होते. एकंदरीत वेगवान नाट्यमय घडामोडीनंतर कारखान्यात सत्तांतर झाल्याने व नवनिर्वाचित संचालक मंडळाने यंदाच्या हंगामात चालू करण्याचे वचन दिल्याने अध्यक्ष कृष्णा पाटील डोनगावकर यांनी पुढाकार घेतला.
त्यानंतर कारखाना जयहिंद शुगर्सला भाडेतत्त्वावर देण्यासाठी संमती देऊन बँक व जयहिंद शुगर्स यांच्यात करार करण्यात आला. त्यामुळे डोणगावकर यांनी कारखाना निवडणूक प्रचारात सभासदांना कारखाना चालू करण्याच्या दिलेल्या वचनपूर्तीकडे एक पाऊल टाकले आहे.
दरम्यान, सोमवारी करार झाल्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जयहिंद शुगर्सने कारखान्याचा ताबा घेतला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील गावंडे व जय हिंदचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कारखाना परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
नगर जिल्ह्यातील कारखान्याचे उस उल्पब्धतेवर होणार परिणाम...
नगर जिल्ह्यालगत असलेल्या गंगापुर-वैजापूर तालुक्याला गोदावरी नदी व जायकवाड़ी धरणाचे पाण्याचे वरदान लाभल्याने या दोन्ही तालुक्यात उस पिकाची प्रचंड लागवड होते. गंगापुर-वैजापूरचे दोन ही साखर कारखाने बंद असल्याने नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपुर, कोपरगांव, संगमनेर, शेवगाव तालुक्यातील साखर कारखान्याना उस पुरवठा होत होता. आता गंगापुर साखर कारखाना सुरु होत असल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याना या पुढील काळात उस टंचाई सामोरे जावे लागणार आहे.