गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला
सार्वमत

गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

दारणा, भावलीच्या पाणलोटातही रिमझिम

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर काल दिवसभरात पावसाचा जोर ओसरला होता. काळे कुट्ट ढग दाटून आले मात्र पावसात जोर नाही, अशी अवस्था दिवसभर होती. दारणाच्या पाणलोटात केवळ अधून मधून रिमझिम स्वरुपाचा पाऊस होता. तर गंगापूर धरण समुहाच्या पाणलोटात पाऊस जवळपास थांबला आहे.

परवा मात्र दारणा समुहातील धरण परिसरात व गंगापूर धरण समूह परिसरात हलका पाऊस होता. मात्र दारणा धरणाच्या पाणलोटातील घाटमाथ्यावरील पाणी तसेच ओव्हरफ्लो असलेल्या भावली धरणातील पाण्यामुळे दारणात काल सकाळी 346 दशलघनफूट पाणी नव्याने दाखल झाले.

काल सकाळी 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 11, इगतपुरीला 47, घोटीला 25 मिमी असा पाऊस झाला. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 6320 दलघफू म्हणजेच 88.40 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. दारणातून 1250 क्युसेकने विसर्ग सुरुच आहे. भावलीतून दारणात 948 क्युसेकने पाणी दाखल होत आहे.

भावलीला काल सकाळी 24 तासांत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे धरण 100 टक्के भरलेले असल्याने त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग पडत आहे. हा प्रवाह दारणात दाखल होत आहे.

गंगापूर धरण परिसरात पावसाचे काळेकुट्ट ढग तयार होतात, मात्र पाउस पडत नाही. गंगापूर समुहाची हिच स्थिती आहे. 5630 दलघफू क्षमतेच्या गंगापूरात 3096 दलघफू पाणी साठा आहे. धरण 54.99 टक्के भरले आहे. काल दिवसभर 2 मिमी पेक्षा जास्त पाऊस या धरणांच्या पाणलोटात नाही.

काल सकाळी संपलेल्या 24 तासात गंगापूरला 8, अंबोलीला 10, त्र्यंबकला 13 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळपर्यंत मागील 24 तासात गंगापूर मध्ये 66 दलघफू नविन पाणी दाखल झाले. कश्यपीत 12 दलघफू, गौतमीत 40 दलघफू नविन पाणी दाखल झाले. कश्यपीचा साठा 26.78 टक्क्यांवर स्थिर आहे. तर गौतमी गोदावरीचा साठा 26.08 टक्क्यांवर स्थिर आहे.

गोदावरीत 1614 क्युसेकने विसर्ग !

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दारणा धरणातुन सोडलेला 1250 क्युसेकने विसर्ग दाखल होत आहे. या बंधार्‍यातुन खाली जायकवाडीच्या दिशेने 1614 क्युसेकने विसर्ग सोडणे सुरु आहे. 1 जून पासुन या बंधार्‍यातुन काल पर्यंत सव्वाचार टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीत 24 तासात त्या परिसरातील पाण्याची आवक झाल्याने अर्धा टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. जायकवाडीत उपयुक्त जलसाठा 42.9 टिएमसी झाला असून हा साठा 55.99 टक्के आहे.

अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 38.49 टक्के, वाकी 19.81 टक्के, भाम 65.11 टक्के, कडवा 36.50 टक्के, आळंदी 1.43 टक्के, भोजापूर 45.98 टक्के, पालखेड 46.66 टक्के, असे साठे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com