गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह यंदा सराला बेटावरच !
सार्वमत

गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह यंदा सराला बेटावरच !

अवघ्या 50 भाविकांत सप्ताह, करोनामुळे इतरांना बेटावर येण्यास मज्जाव

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

करोनाच्या पार्श्वभुमिवर येत्या पंचमीपासून प्रारंभ होत असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची अनिश्चितता होती. परंतु आता या सप्ताहात खंड पडू नये म्हणून हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा एकादशीला उद्या 16 जुलैला पुणतांबा येथे महंत रामगिरी महाराज करणार आहेत. 173 वर्षांची परंपरा खंडित न होता, ती अखंड राहणार आहे!

सदगुरू गगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 173 वा नियोजन बैठक सराला बेट येथे रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला वैजापूरचे आमदार रमेशराव बोरनारे, कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, किशोर थोरात, कमलाकार कोते, संदीप पारख, मधु महाराज कडलग, सोमनाथ महाले, अनिल पवार, श्रीरामपूरचे तहसीलदार पाटील व अधिकारी उपस्थित होते.

हा सप्ताह श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे होऊ घातला होता. तेथील ग्रामस्थांनी या सप्ताहाची उत्तम तयारी सुरू केली होती. परंतु करोना संसर्गामुळे या सप्ताहाला अडचणी आल्या. त्यामुळे हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचे निश्चित करण्यात आले. हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित राहण्याची कोणत्याही भाविकास परवानगी राहणार नाही. त्यामुळे वाहिन्यांवर अथवा वृत्तपत्रांतून या सप्ताहाचा आनंद भाविकांना घ्यावा लागणार आहे. सराला बेटाकडे येणारे सर्वच रस्ते सप्ताह काळात बंद करण्यात येणार आहेत.

रामगिरी महाराज यांनी सांगितले की आपल्यावर करोनाचे मोठ्या प्रमाणावर संकट आले असून यामध्ये शासनाने योग्य पद्धतीने पावले उचलली आहेत. शासकीय आदेशाचे पालन करून सप्ताहाची परंपरा फक्त पन्नास भाविकांच्या उपस्थितीत सराला बेटांवर पार पडेल.

प्रथेप्रमाणे सप्ताहाची घोषणा पुणतांब्यात एकादशी निमित्त करण्यात येते. यासाठी महंत रामगिरीजी महाराज खास पत्रकार परिषद घेऊन सप्ताहाची घोषणा करणार आहेत. 16 जुलै रोजी प्रातिनिधिक स्वरूपात पुणतांबे येथे नारळ देण्यात येईल, तसेच इतर सर्व कार्यक्रम पाच भाविकांच्या उपस्थितीत पार पडेल. कोणत्याही भाविकांनी बेटावर येऊ नये. घरीच राहून सप्ताहाचा आनंद घ्यावा यासाठी टीव्ही व मोबाईलवर थेट प्रेक्षपण करण्यात येईल. वृत्तपत्रात बातम्या येतील तशी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनच्यावतीने गोदावरी नदीच्या पुलावर पोलीस बदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याबाबत महंत रामगिरी महाराज पुणतांबे येथे सविस्तर माहिती देणार आहेत. सराला बेटावर बैठकीसाठी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मंडल अधिकारी बनकर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी मंहत रामगिरी महाराज यांच्यासोबत 173 व्या सप्ताहानिमित्त दूरध्वनी वरून चर्चा केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा सपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com