...गंगापूर धरणातील पाण्याची अशीही पळवापळवी!

एकदरेचे पाणी वाघाडला! गंगापूरचे काय?
...गंगापूर धरणातील पाण्याची अशीही पळवापळवी!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दमणगंगा आणि नारपार खोर्‍यातील पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत सध्या नियोजन चालू आहे. राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाकडून तसेच राज्य शासनाकडून त्यासंदर्भात संदर्भिय योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामध्ये पाच टीएमसी क्षमतेची दमणगंगा-एकदरे ही योजनाही यात समाविष्ट आहे.

या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सुध्दा पूर्ण झालेला आहे. या योजनेचे पाणी गंगापूर धरणात आणण्याचे मुळ नियोजनात प्रस्तावित होते. या पाण्याच्या उपलब्धतेनंतर पिण्याचे पाणी तसेच भविष्यकाळात प्रस्तावित असलेला दिल्ली-मुंबई-इगतपुरी-सिन्नर या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या दुसर्‍या टप्प्यासाठी पाणी देण्याचे नियोजन होते.

परंतु यात झालेल्या हस्तक्षेपामुळे त्या प्रकल्पाची क्षमता पाच वरून दोन टिएमसी करुन ते पाणी गंगापूर धरणाऐवजी पालखेड धरण समुहातील वाघाड प्रकल्पात वळविणेचा निर्णय ऐनवेळी परस्पर घेतला जात असल्याचे समजते. वास्तविक गंगापूर - दारणा समुहातील सध्याचे बिगरसिंचन पाणी आरक्षण आत्ताच बेचाळीस टक्क्यांच्या वरती पोहचले आहे. दमणगंगा एकदरे योजनेचे 5 टीएमसी पाणी मिळाले असते तर गंगापूर - दारणा समुहातील धरणावरील बिगर सिंचनाच्या पाण्याचा भार काही अंशी कमी झाला असता आणि त्याचा लाभ सिंचनासाठी झाला असता.

दारणा-गंगापूर धरण समुहातील पाण्यावरच राहाता-कोपरगाव तालुक्यातील गोदावरी कालव्याचे सिंचन अवलंबून आहे. सध्या पाण्याची तुट निर्माण झाल्याने शेती व्यवस्था आताच धोक्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पश्चिमेच्या पाण्याच्या आशेवर येथील शेतकरी आशेने पहात होता त्यावर पाणी फिरते की काय? या भितीने शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पाण्याची अशी ही पळवापळवी गोदावरी कालव्यावरील शेतकर्‍याच्या मुळावर येईल असे चित्र सध्या दिसत आहे.

याच पध्दतीने अन्य योजनांच्या पाण्याचीही पळवापळवी झाली तर पश्चिमेचे पाणी म्हणजे फक्त घोषणेपुरते मर्यादित होऊन ते एक मृगजळ ठरेल, अशी भिती जनसामान्यात दिसून येत आहे. वास्तविक मुळ नियोजनात संबंधितांना विश्वासात न घेता असे बदल होत असतील तर मग कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आह. आपलेच दात अन् आपलेच ओठ, असे समजून अळीमिळी गुपचिळी धरली तर त्याचे दुष्परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभधारकांना हमखास भोगावे लागतील.

दमणगंगा नदीवर पेठ तालुक्यातील एकदरे गावाजवळ जवळपास 5 टिएमसी क्षमतेचे आणि 860 कोटी रुपये अंदाजपत्रकीय खर्च असलेले एकदरे धरण प्रस्तावित आहे. ते पाणी 210 मीटर उंचीवर उपसा करून 5.5 किमी लांबीच्या बोगद्यातून गंगापूर धरणात आणण्याचे मुळ नियोजन होते. या पाण्यापैकी 2.5 टिएमसी पाणी पिण्यासाठी, 1 टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी आणि 1.5 टीएमसी पाणी सिंचनासाठी प्रस्तावित होते. याचा लाभ गोदावरी कालव्यांना झाला असता. मात्र सद्यस्थितीत हे मूळ नियोजन पूर्णतः बदलले आहे. त्याचा फटका अर्थातच गोदावरी कालव्यांना बसणार आहे. यासंदर्भात आत्ताच जागरुकता दाखविली नाही तर अन्य योजनांवर सुध्दा अशीच संक्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दमणगंगा-एकदरे योजनेचे पाणी मुळ नियोजन प्रमाणे गंगापूर धरणात आले असते तर त्याचा फायदा गोदावरी कालव्यांना निश्चितपणे झाला असता. परंतु या पध्दतीने पाण्याची पळवापळवी होत असेल तर हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. उर्ध्व वैतरणा धरणाचे जवळपास 8 ते 9 टीएमसी उपसा न करता प्रवाहाने येऊ शकते. परंतु त्याबाबतही क्षेत्रीय पातळीवर फारसी ठोस हालचाल दिसुन येत नाही. पश्चिमेच्या पाण्याचा आवाज जास्त आणि वास्तविकता कमी असेच काहीसे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्याकडे बोट दाखवून पाण्याची जाग्यावरच पळवापळवी होत असेल तर तिकडेही सातत्याने जागरुक राहुन लक्ष देणे गरजेचे आहे.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Related Stories

No stories found.