गंगापूर धरण 87 टक्के भरले !
सार्वमत

गंगापूर धरण 87 टक्के भरले !

जायकवाडी 70 टक्क्यांवर, विसर्ग: दारणा 1750, गोदावरीत 4842 क्युसेक

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर काल दिवसभर अधून मधून पावसाची रिपरिप सुरू होती. पाण्याची आवक कमी झाल्याने दारणाचा विसर्ग 1750 क्युसेक इतका करण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन मात्र गोदावरीत 4842 क्युसेकने विसर्ग काल दिवसभर टिकून होता. गंगापूर धरण काल सायंकाळी 87 टक्के भरले होते. तर जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 69.60 टक्के पाणी साठा झाला होता.

दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात पावसाची खंडा खडाने रिपरिप सुरू होती. गंगापूरच्या पाणलोटातही मध्यम ते हालक्या स्वरुपाचा पाऊस काल दिवसभर अधून मधून पडत होता. पावसाचा जोर काहिसा कमी झाल्याने नविन येणार्‍या पाण्याची आवक कमी झाल्याने दारणातील विसर्ग काल सकाळी 6 वाजता 4164 क्युसेकने सुरू होता.

तो दुपारी 12 वाजता अवघा 1750 इतका करण्यात आला. तो काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत तसाच टिकून होता. काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 4, घोटीला 25, इगतपुरीला 44 मिमी पावसाची नोंद झाली होती. भावलीचा 135 क्युसेकचा विसर्ग, भामचा 2020 हा विसर्ग दारणात दाखल होत होता.

दारणात 24 तासांत 474 दलघफू नविन पाणी दाखल झाले होते. तर भावलीत 17 दलघफू नविन पाणी दाखल झाले होते.दारणाचा साठा 89.65 टक्क्यांवर स्थिर ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भावली, दारणा, भाम या धरणानंतर इगतपुरी तालुक्यातील कडवा धरण 100 टक्के भरले आहे.

अद्याप या धरणातून विसर्ग सुरू झालेला नाही. नाशिक तालुक्यातील वालदेवी धरणही 100 टक्के भरले आहे. त्यातून 250 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी दारणा च्या खाली दारणा नदीत येऊन खाली गोदावरीत पर्यायाने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहे.

जायकवाडी 70 टक्के !

काल सायंकाळी 6 वाजेच्या आकडेवारी नुसार जायकवाडी धरणात 13 हजार 792 क्युसेकने नविन पाण्याची आवक सुरू होती. हे धरण 69.60 टक्के भरले होते. काही तासात ते 70 टक्के झालेले असेल. त्यातील उपयुक्तसाठा 53.3 टिएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 79.4 टिएमसी इतका झाला आहे.

जायकवाडीमधील जिवंत पाणीसाठा दि. 16 ऑगस्ट 2020 रोजी 65 टक्के झालेला आहे. परंतु मेंढेगिरी अहवालानुसार तो 15 आक्टोबर रोजी 65 टक्के असणे अपेक्षित आहे. जायकवाडी फुगवट्यातून मंजुरीपेक्षा मोठ्या प्रमाणात होणारा बेसुमार बेकायदा पाणी उपसा सर्वज्ञात आहे. हा बेकायदा पाणी वापर खरीपातील पाणी वापराच्या हिशोबात येणे अर्थातच शक्य नाही. परंतु याचा परिणाम मात्र जायकवाडीतील जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी घटण्यात निश्चितपणे होतो. त्यामुळे दि. 15 ऑक्टोबरपर्यंत जर अशी टक्केवारी घटली गेली तर, पासष्ट टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे या सबबीखाली वरील धरणातून पाणी मागितले जाऊ शकते. त्यामुळे ज्या तारखेला जिवंत पाणी साठा 65 टक्के झालेला आहे, त्या तारखेला, त्या वर्षासाठी, समन्यायीचा पाणी वाटपाचा हिशोब अंतीम व्हावा आणि त्या वर्षी वरील धरणातून पाणी सोडण्याची गरज नाही, असे घोषित होणे गरजेचे आहे. कारण पावसाळा हंगामातही नगर नाशिक भागात पाणी वापरावर बंधने असतात मात्र जायकवाडीतील फुगवट्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा पाणी वापर मात्र चालूच असतो.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com