गंगापूर बंधार्‍याला भगदाड

गंगापूर बंधार्‍याला भगदाड

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर मांडवे बंधार्‍यावरील पुलाला भगदाड पडल्याने बंधार्‍याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मध्यंतरी कोल्हार येथील नगर-मनमाड रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने बेलापूर वरून राहुरीच्या दिशेने वळवली होती. त्यातील बहुतांश वाहने ही गंगापूर मांडवे बंधार्‍यावरून ये-जा करत होती. या अवजड वाहतुकीमुळे पुलाला भगदाड पडले असावे, अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली.

अगोदरच हा पूल जुना व कमकुवत झाला आहे. बंधार्‍याला काही ठिकाणी गळतीही लागली आहे. गंगापूर व मांडवे मांडवे येथील नागरिक दैनंदिन दळणवळणासाठी याच बंधार्‍यावरील पुलाचा वापर करत असतात. भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष घालून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. गंगापूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश खांडके यांनी लोणी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता यांना पत्र पाठवून भगदाड पडलेल्या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करणेकामी विनंती केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com