
बोधेगाव | प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या (Gangamai Sugar Factory) परिसरात असलेल्या इथेनॉल प्लँटच्या (Ethanol Plant) टाक्यामध्ये अचानक आग (Fire) लागली. ही आग सुमारे ८ तासानंतर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आटोक्यात आणण्यात संबधित यंत्रणेस यश मिळाले.ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे गंगामाई साखर कारखाना प्रशासनाने जाहीर केले आहे
या आगीत कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातील एकूण २९ टाक्यांपैकी 14 लहान मोठ्या टाक्यासह एक टँकर आगीच्या भक्षस्थानी पडल्या, तसेच आगीच्या या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची माहिती कारखान्याच्या प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आली. तर संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत चोऱ्या करून काही वस्तू लंपास केल्या आहेत.
घटनास्थळी पोहचलेल्या जिल्हा व नजीकच्या मराठवाड्यातील जवळपास १४ अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत कारखान्याचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची व या कर्मचा-यांवर शेवगाव येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येवून जखमींना घरी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला सायंकाळी ७ वा. सुमाराला आग लागली. ही आग लागताच तेथील कर्मचारी जीवाच्या आकांताने बाहेर पळाले. काही क्षणात आगीने रुद्र रूप धारण केल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या तहसीलदार छगन वाघ, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस विभागाच्या पथकाने परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व पैठण - शेवगाव मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद केली.
कारखान्यातील कर्मचारी व वसाहतीतील कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सुद्धा सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण घेतलेल्या कारखान्यातील काही कर्मचा-यांनी यावेळी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतभैय्या मुळे, मार्गदर्शक संदीप सातपुते हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. ते रात्रभर तेथे तळ ठोकून होते.
या घटनेनंतर कारखान्याचे थांबलेले गळीत आज रविवारी रात्री उशिरापर्यंत पुन्हा पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक विष्णु खेडेकर, प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर यांनी दिली. आ.मोनिका राजळे, केदारेश्वरचे चेअरमन अड.प्रतापराव ढाकणे, माजी जिप सदस्य राहुल राजळे आदींनी रविवारी घटनास्थळी भेट देवून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
कारखान्यासह इथेनॉल प्रकल्पात बसविण्यात आलेल्या स्वयंचलित संगणीकृत यंत्रणेमुळे जीवित हानी टळली असली तरी झालेल्या वित्तीय नुकसानीची माहिती कारखान्याच्या तज्ञ यंत्रणेकडून संकलित करण्यात येत असून त्यानंतरच झालेल्या नुकसानीचा तपशील हाती येणार असल्याचे कारखाना सूत्रांकडून सांगण्यात आले.