गंगागिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा यंदा साध्यापणाने - रामगिरी

गंगागिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा यंदा साध्यापणाने - रामगिरी

माळवाडगाव (वार्ताहर) -

श्रीरामपूर -वैजापूर तालुका गोदाकाठ हद्दीवरील श्रीक्षेत्र सराला बेट येथील योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज

यांचा 118 वा पुण्यातिथी सोहळा दि. 12 व 13 जानेवारी 2021 रोजी सालाबादप्रमाणे यात्रोत्सव न भरता साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गोदावरी तिरावरील श्रीरामपूर तालुक्यातील क्षेत्र सराला बेट येथील मार्गशीर्ष अमावस्येला असणारा योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज पुण्यातिथी सोहळा भाविकांच्या दर्शनासाठी आकर्षण असतो. दरवर्षी प्रचंड गर्दीत भरणार्‍या यात्रा उत्सवातील मोठमोठ्या दुकानांची कोट्यावधीची उलाढाल होते.

पंचक्रोशितील गावोगांवचे भाविक भक्त महिला भगिनी छोट्या मोठ्या भांड्यापासून तर लाटणे पोळपाटापर्यतच्या संसारउपयोगी वस्तूची खरेदी करतात. शासनाच्या करोना महामारीच्या नियमामुळे यार्षीचा सदगुरू गंगागिरी महाराज 118 व्या पुण्यातिथी सोहळ्यात यात्रा दुकाने असणार नाहीत. गोदावरी बंधार्‍यात पाणी असल्याने वांजरगाव (वैजापूर) बाजूनेच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना पुलावरून पायी प्रवेश दिला जाणार आहे.

मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी पारंपारीक पध्दतीने सायंकाळी 4 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या किर्तनानंतर आमटी भाकरी प्रसाद होईल. दुसर्‍या दिवशी बुधवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने पुणयातिथी सोहळ्याची सांगता होणार असल्याचे सदगुरू गंगागिरी महाराज ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांच्यावतीने सांगण्यात आले.

श्रीक्षेत्र सराला बेट व श्रीक्षेत्र देवगड संत भेटीची महान परंपरा

श्रीक्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वरमधून उगम होणार्‍या गोदातीरावर श्रीक्षेत्र सराला बेट व श्रीक्षेत्र देवगड हे भक्तांचे अपार श्रध्दा असलेले तिर्थक्षेत्र आहेत. श्रीक्षेत्र देवगड येथील पौर्णिमेच्या दत्त जयंती सोहळ्यानंतर पंधरा दिवसाने अमावस्येला सराला बेटावर पुण्यतिथी सोहळा पार पडतो. या दोन्ही सोहळ्याचे निमित्ताने दोन्ही संस्थानच्या महंताची दरवर्षी सदिच्छा दर्शन भेटीची परंपरा जोपासली जात आहे. दत्तजयंती सोहळ्यानिमित्ताने महंत रामगिरी महाराज यांनी देवगडला दर्शन भेट दिल्यानंतर काल महंत भास्करगिरी महाराज यांनी गंगागिरी महाराज पुण्यतिथी निमित्त सराला बेट येथे सदिच्छा भेट देऊन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरासह परिसर विकास कामांची पाहणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com