दुसर्‍याच्या सुखात दु:खी होणे ही चित्ताची मलीनता- महंत रामगिरी

दुसर्‍याच्या सुखात दु:खी होणे ही चित्ताची मलीनता- महंत रामगिरी

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

दुसर्‍याच्या सुखात दु:खी होणे ही चित्ताची मलिनता आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.

श्रीक्षेत्र सराला बेटावर सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवसाच्या सहाव्या प्रवचन पुष्पाच्या निमित्ताने दैनिक सार्वमतशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना महंत रामगिरी महाराजांनी भगवत गीतेतील 16 व्या अध्यायातील पहिल्या श्लोकावर यज्ञ, स्वाध्याय आणि तप या लक्षणांचे चिंतन केले.

यज्ञ म्हटले की लोक टीका करतात, तेल तूप जाळतात अशी टीका करतात. तूप गोरगरिबांना खाऊ घातले पाहिजे, असे म्हणतात, पण यज्ञ करायचा नाही असा त्याचा अर्थ नाही. मग यज्ञयाग हे भगवंताच्या भक्तीपेक्षा वेगळे आहे का? सराला बेटावर 2014 मध्ये 201 कुंडी यज्ञ केला होता, त्याचा लोकांना लाभही झाला होता, त्यावर काहींनी टीकाही केली होती.

एकाने विचारले होते, तुम्ही एवढे तूप, गरिबांना अन्न म्हणून द्या, वाया जाते ते तुम्हाला दिसते, तो तुमचा दृष्टीकोन आहे. हवनादि क्रिया करताना पाहाणाराना अग्नित विविध पदार्थ जाळल्यावर त्याचे परिणाम त्या व्यक्तीला माहिती नाही, अज्ञानामुळे संशय आहे. त्याच्या परिणामाची जाणिव त्याला होईल मग कळेल.

यज्ञात टाकलेले पदार्थ आयुर्वेद शास्त्रात त्याचे रसायन शास्त्र सांगितले. अग्निचे काम पदार्थातील सुक्ष्म कण बाजुला काढणे! पदार्थातील सुक्ष्म पदार्थ वातावरणात पसरविल्याने वातावरणातील दोष नाहिसे होतात. वातावरण पवित्र, शुध्द होते. हवन हाच यज्ञ असे नाही तर कर्म यज्ञ सुध्दा आहे. यज्ञ कर्म आहे, ज्ञान श्रवण करतो हा यज्ञच, एखादा नुसता कर्मच करतो, ज्ञान नसेल तर काय उपयोग? ज्ञान असेल अन् कर्म नसेल तर उपयोग काय?

मदत करणे हा कर्म यज्ञ !

भुकेलेल्याला अन्न द्या, आजारींना औषध द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघडं असेल तर त्याला कपडे द्या, हे कर्म यज्ञच आहेत. संत एकनाथ महाराज कावडीने पाणी आणत होते, एक गाढव पाण्यावाचून तळमळत होते, विचार केला हे पाणी जर भगवंताला असे नेले तर ते भगवंत या जलाभिषकाचा स्विकार करणार नाही. कारण भगवान असे सांगत नाही की इतरांना उपाशी ठेवा, अन त्याचा उपयोग आम्हाला द्या! एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजले. त्यांच्याबरोबर असणारी मंडळी हसु लागली. माझ्याकडे पाणी आहे, अशा वेळी त्याला पाणी पाजणे हाच आपला अभिषेक, धर्म आहे. पूजा आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी पाणी पाजले.

पुर्वजांमुळे संस्कृती टिकून

भागवतात उल्लेख असलेला रणतीदेव नावाचा राजा होता. तो दयाळू होता, प्रजेला सांभाळत त्यांचे उदाहरण देत महाराज म्हणाले, तो दुसर्‍याच्या सुखात आपले सुख मानत असे. ते देवाकडे दुसर्‍याचे दु:ख मागत असायचे, माझे सुख त्यांना द्या. त्यांचे दु:ख मला द्या, असे एकापेक्षा एक महापुरुष आपल्या संस्कृती मध्ये पुर्वजांमध्ये होऊन गेले. पुर्वजांचे संस्कार आपल्यावर आहेत. म्हणून धर्म संस्कृती टिकून आहे. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या हा सुध्दा यज्ञच आहे. यातच भगवंत संतुष्ट आहे. कर्तव्य करत असाल तर ती पूजा आहे. यज्ञ ही महापूजा आहे, दुसर्‍याच्या दु:खाने दु:खी होतो, काही जण दुसर्‍याच्या सुखाने दु:खी होतात, ही चित्ताची मलिनता आहे. धनवानही दु:खी, मनुष्य जेव्हा आपल्या कर्मावर, कर्तृत्वावर संतुष्ट नसतो तेव्हा तो दु:खी असतो. बर्‍याच वेळा मनुष्य हतबल होतात. आत्मदेवाचे उदाहरण महाराजांनी दिले. आत्मदेव निपुत्रिक होते, लोकांच्या टोमण्यामुळे ते आत्महत्या करायला निघाले होते. शहाण्यांना अपमान सहन होत नाही. मृत्यू पेक्षा अपमान मोठा वाटतो. जीवनात काही सार नाही, अशी वृत्ती निर्माण होते, अशा व्यक्तीला अश्वासन देणे, त्याचा तणाव कमी करणे हा सुध्दा एक यज्ञच! वाईट विचार हळू हळू शांत केले, तर आत्महत्येपासून तो वाचू शकतो, हे सज्जनाचे कर्तव्य, जो दु:खी असेल त्याला दु:खापासून मुक्त करावे. ज्याच्या पोटात गरज आहे, त्याला अन्न द्या, त्याला मदत करणे महत्त्वाचे, माता पित्याने अन्न करणे, पित्रांना पिंडदान करणे, हे कर्मसुध्दा परमात्म्याला समर्पित होत असते.

मन हे निरर्थच चिंतन करत असते. सुख आणि दु:ख देणारे मनच आहे. मनाला अंतर्मुख बनवायाचे म्हणजे मंत्र, मंत्र म्हणजे थोरा मोठ्याचा सल्ला! कारण त्यांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होतो. लहानांच्या सल्ल्याचा उपयोग होतो. सात वर्षाच्या कृष्णाने नंद बाबाला इंद्रयाग बंद करा आणि गोवर्धन पूजा करण्याचा सल्ला दिला.

मेंटलचा सल्ला !

एकदा एक मंत्री महोदय जंगलातून चालले, तेथे मेंटल हॉस्पिटल होते, गावाच्या बाहेर होते. सरकारी होते, त्यातून गोरगरिबांची सेवा करत होते. गाडी समोरच बंद पडली. एक मेंटल गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण करू लागला. त्या गाडीचे चारही नट खराब झाले होते. चाक गळाले असते. ऐका माझा सल्ला, या तीनही चाकांचा एक एक नट काढा आणि चाकाला बसवा! कधी कधी वेड्यांचे सल्ले ऐकले पाहिजे. थोरामोठ्यांचा सल्ला घेत जावा, पण काही लहानही असेल त्यांचाही सल्ला घ्यावा, सल्ला म्हणजे मंत्र.

स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय, स्वत:चे अध्ययन करणे म्हणजे अध्याय आहे, जप पठण अध्ययन त्याला स्वध्याय म्हणतात. स्वत:ची जाणीव करणे म्हणजे स्वाध्याय. तप म्हणजे सहनशिलता, सुख, दु:ख, भूक, तहान सहन करणे म्हणजे तप, जंगलात जाऊन तप करणे म्हणजे ऊन वारा सहन करतो. जी परिस्थिती निर्माण झाली, ती सहन करणे म्हणजे तपस्या! 9 वे लक्षण अर्जव! अर्जव म्हणजे साधेपणा सरळ पणा, माणसाने सरळ आणि साधे असावे, विचारात सरलपणा असतो तोच साधू असतो. त्याचे रक्षण भगवान करतो. महात्म्यांचे मन, वाणी, वचन, कर्म, यांत सारखेपणा असतो, पण दृष्ट लोकांचे मन, वाणी आणि कर्म यात भेद असतो. मनात वेगळे अन् कृतीत वेगळे असेल त्याला दंभ म्हणतात, दांभिकता दूर ठेवा. जो फसतो त्याचे नुकसान नाही, मात्र फसविणाराचेच नुकसान आहे. फसणारांची तेवढ्या क्षेत्रात फसवणूक होईल पण जास्त फसवणूक फसविणाराची होते. साधूच्या स्वभावात सरलता असते. केवटाच्या सरललतेपणामुळे केवटाची नाव पैलतिरी लावली. हा प्रसंग सविस्तरपणे सांगत महाराजांनी सरलता या लक्षणाचे महत्त्व सांगितले.

ज्याच्या स्वभावात सरलता असते, भगवंताची त्याच्यावर कृपा असते. दांभिकता ज्याच्या जवळ येऊ नये म्हणजेच ते अर्जव! एकनाथ महाराज पुजेला बसलेले होते, एक मनुष्य पायात जोडे घालून समोरील पाटावर उभा राहिला. आपण जर पूजा करत असतो, अन् कुणी येऊन उभा राहिला तर? पण एकनाथ महाराजांनी त्याचे कौतुक केले. काय सरलता आहे, सरलता हे साधुचे सौंदर्य आहे. संतचरित्राचा विचार केला तर प्रत्येकाच्या स्वभावात सरलता आहे.

बालकाप्रमाणे साधुचा स्वभाव असतो, सरलता असते. महाराजांनी एक प्रसंग सांगितला. एका माणसाने एका सावकाराकडून कर्ज घेतले, सावकार आला की हा लपून बसतो, लहान मुलाला तो सांगतो, मी येथे नाही असे सांग, त्यावर त्या मुलाला सावकार विचारतो, तुझे वडील कोठे आहेत? मुलगा म्हणतो, वडील म्हणतात मी येथे नाही, असे त्यांनी सांगायला सांगितले. लहान मुलांच्यामध्ये सरलता आहे. कुठल्याही प्रकारची मलिनता, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, अशा प्रकारची सरलता येते तेव्हा भगवंत सांंगतात की, असा भक्त मला प्रिय आहे. भक्तीची खरी परिपक्वता ही आहे. भक्ती दाखवितो, प्रेम करतो, पण स्वभावात जर सरलता नसेल तर त्या भजनाचा लाभ होऊ शकणार नाही. दंभाचा त्याग करा, अहंकाराचा त्याग करा. मग भगवंताच्या भजनाचा आनंद मिळेल.

सप्ताह आश्चर्य !

सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेला हा सप्ताह म्हणजे आश्चर्य आहे. या मागे महाराजांची शक्ती आहे. महाराजांनी जिथे सप्ताह सुरू केला तेथे हा सप्ताह सुरू म्हणजे अमृताचा योग आहे. कमी भजन्यांमध्ये भजन केले. खंड पडू दिला नाही. सर्वांचेच सहकार्य मिळाले. आज सांगता आहे. थोडक्यात काला करून सांगता होईल.

सार्वमत चे कौतुक !

महंत रामगिरी महाराजांनी प्रवचन मालिका दैनिक सार्वमतने सार्वमत संवादमध्ये प्रसिध्द केली. अतिशय चांगल्या पध्दतीने भाविकांपर्यंत सप्ताह नेला. सार्वमतचे महाराजांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com