निंद मनुष्य सत्संगात आला तरी त्याचे कल्याणच होते- महंत रामगिरी

निंद मनुष्य सत्संगात आला तरी त्याचे कल्याणच होते- महंत रामगिरी

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

भगवंताने मनुष्य शरिरच भगवंत प्राप्तीकरिता दिलेले आहे. मग कितीही निंद मनुष्य असला, भगवंताने मनुष्य एखादा दुराचारी आहे, जिज्ञासा झाली आणि तो सत्संगात आला तर, त्याचे अकल्याण कधीही होणार नाही, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवसाच्या चौथ्या पुष्पात महंत रामगिरी महाराज यांनी दैनिक सार्वमतशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना भक्ती आणि ज्ञान यावर विवेचन केले.

भगवतगितेतील 16 व्या अध्यायातील पहिल्या श्लोकातील अभय, सप्तसंशुध्दी दोन लक्षणांचा अभ्यास केला. आता ज्ञान योग व्यवस्थितीही या लक्षणावर महाराजांनी आपले विचार मांडले. ज्ञान योग व्यवस्थिती यात योग म्हणजे जोडणे, चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग, चित्तवृत्तीतील दोष दूर होतो.

कर्म आणि उपासना या मार्गात मल आणि विक्षेप दोष नष्ट होतात, हे स्वत:च्या प्रयत्नाने नष्ट होतात, पण आवरण दोष हा गुरुच्या कृपेने नष्ट होतो, अंत:करणात अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात, कारण ईश्वर दिसत नाही, काही मानतात, काही मानत नाही, पृथ्वीचा गंध हा गुण आहे, स्पर्श कठोर, जल रंग श्वेत, जलाला रंग नाही, निळेही भासते, आकाशाचा रंग पडतो, या जलाचा गुण आहे रस, स्पर्श शितल, गुण रस आहे, अग्निचा स्पर्श उष्ण आहे, रंग लाल आहे.

अग्निचा गुण रुप आहे, पृथ्वी, जल आणि अग्नि आपण डोळ्यांनी पाहू शकतो, वायु पाहू शकत नाही, स्पर्श जाणवतो, वायुला रंग नाही, अशाप्रकारे वायु दिसत नाही, जी गोष्ट दिसत नाही, ती मानायची नाही म्हणून पाहायची नाही, पण वायु स्पर्शाने वायुची जाणीव तशी परमात्म्याची जाणीव स्पर्शाने कुठे होते? मग का मानावे ? स्पर्शाने झाडाची पाने हलतात. म्हणून तो जाणवतो, आकाशाला रुप नाही, निळे निळे दिसते ते आकाश नाही, शब्द गुणाद्वारे अकाश जाणवते, भान होते, पण त्या ईश्वराचे भान होत नाही.

ज्या जिवाला भान नाही, ते अभानापादक अवारण! भान होत नाही, दिसत नाही, स्पर्श होत नाही, कोणी सांगते म्हणून का म्हणायचे, असत्वापादक आवरण असे त्याला म्हणायचे, कारण ते दिसत नाही. या दोन्ही आवरणाला एक आवरण कारण आहे वासनेचे आवरण! हे का जाणवत नाही तर आपल्या अंत:करणात अनेक प्रकारच्या वासना आहेत. ते परमतत्व तर फार सुक्ष्म आहे, ते परमतत्व इंद्रियाद्वारे आकलन होऊ शकत नाही.

स्थूल तत्व, हे तत्व मनाद्वारे, बुध्दीद्वारे आकलन होऊ शकत नाही. चित्ताद्वारे आकलन होवू शकत नाही. अंतकरणाची वृत्ती त्याच्या पर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून त्याचे भान होत नाही. कारण अंतकरणात अनेक प्रकारच्या वासना भरलेल्या आहे. त्याला वासनेचे आवरण म्हणतात. अज्ञानामुळे या सर्व वासना आहे. म्हणून तो परमात्मा अति सुक्ष्म आहे. रेश्मी कापड शिवायचे असेल, सुई सुध्दा तशीच नाजूक पाहिजे, एकाने शिवण्यासाठी पहार आणली, पहारीने शिवले जाते का ? त्याप्रमाणे स्थुल बुध्दी प्रमाणे तो भगवान आकलन होणार नाही.

मनाची बुध्दीची स्थुलता पहारीप्रमाणे आहे. परमात्म्याची सुक्ष्मता त्या वस्त्रा प्रमाणे आहे. सुक्ष्म असणारे परमतत्व आकलन होण्यासाठी आपल्या अंतकरणात विषय आणि विकरांनी युक्त अशी बुध्दी आहे, ती परमात्म्याला आकलन करू शकत नाही. अंंत:करणात जिज्ञासा आहे, इच्छा पण आहे. साधूसंत यांनी घरादाराचा त्याग केला ते वेडे आहेत का हो?

त्यागात आनंद !

एकनाथ महाराज म्हणतात, ज्यांनी राज्याचा त्याग केला, ते वेडे आहेत का? असा त्याग कोण करील बर! अनेक राजांनी राज्याचा त्याग केला. गोपिचंद राजा, भरत, कितीतरी उदाहरणे, ज्या अर्थी राजसत्ता या अनुकूल असताना त्याग करतो, त्या अर्थी राजयोग आनंदात मिळणार्‍या आनंदापेक्षाही विशेष आनंद आगळा वेगळा आनंद त्यागात मिळत असला पाहिजे. अशा प्रकारचा विचार जिज्ञासु करतो. रहस्य जाणण्याची तळमळ त्यांच्यात असते पण मार्ग सुचत नाही, अशा वेळेला सदगुरुंची शरणागती! सदगुरू आपल्या क्षमतेनुसार आपल्या ला मार्गदर्शन करतात.

सदगुरू साधकाच्या क्षमतेनुसार त्याला उपदेश करतात. त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतात. अशाप्रकारे जो साधक हा जिज्ञासु आहे. त्या जिज्ञासुचे चार प्रकार आहेत. मृदू साधक, मध्य साधक, अभिमात्र आणि अभिमात्रतम साधक हे चार प्रकार शिवसंहिता नावाच्या ग्रंथात दिले आहेत. मृदू साधकाचे चार लक्षणे सांगितले आहेत. ज्याची बुध्दी मंद आहे, शक्ती मंद आहे, मुड म्हणजे ज्याच्या अज्ञानता भरलेली आहे, रोगी अनेक रोग भरलेले, लोभी त्याचे चित्त लोभाने भरलेले आहे, भयाने बरबटलेला, ज्याचा रंग कठोर, जो पराधिन आहे. जोबहुभक्षी आहे, जो निंदक आहे ज्याची बुध्दी पापाने भरलेली आहे. जो स्त्रीच्या अधिन झालेला आहे. ज्याची शक्ती मंद, पण त्याला जिज्ञासा आहे.

याला मृदू साधक म्हणतात, जवळजवळ याच्यात गुण काहीच नाही पण हे सर्व दोष भरलेले आहे. त्याच्यात जिज्ञासा असेल आणि तो गुरुंच्या जवळ गेला. संत दयाळु असतात, संत त्याच्या जवळ जातात, योग्य मार्गदर्शन मुक्त स्थिती प्राप्त करून देणारे सदगुरू असतात. असा एखादा मनुष्य आहे, आणि तो जर सदगुरुंकडे गेला, यथार्थ रितीने जर त्याने सदगुरुंची सेवा केली.सदगुरुंचे मार्गक्रमण करुन जर त्यांने साधना केली, तर त्याला 12 वर्षांमध्ये साक्षात्कार होऊ शकतो.

भगवंताने मनुष्य शरिरच भगवंत प्राप्तीकरिता दिलेले आहे. मग कितीही निंद मनुष्य असला, भगवंताने मनुष्य दखादा दुराचारी आहे, जिज्ञासा झाली आणि तो सत्संगात आला तर, त्याचे अकल्याण कधीही होणार नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्याने जेवढी पापे केली तेवढे पाप आपण करू शकत नाही, भगवंताच्या नामामध्ये पाप जाळण्याचे सामर्थ्य आहे तेवढे पाप आपण करुच शकत नाही. पुण्य कर्म करण्याची इच्छा आहे, गुरुवर, शास्त्रावर श्रध्दा आहे, त्याला मध्य साधक म्हणतात.

याला जर जिज्ञासा निर्माण झाली आणि त्याने जर सदगुरुंची कृपा संपादन केली तर सहा वर्षात त्याला साक्षात्कार होऊ शकतो. तिसरा अभिमात्र साधक ज्याची बुध्दी स्थिर आहे. बंधन, इंद्रिय बलवान आहे, दयाळु आहे, प्राणि मात्रावर दया करतो, सत्यवादी आहे, गुरुवादी आहे, गुरुच्या सेवेत तत्पर आहे, अभ्यासकी आहे हा अभिमात्र साधक आहे, गुरुंच्या सेवेत अज्ञाधारक असेल तर तीन वर्षात त्याला साक्षात्कार होऊ शकतो.

चौथा आहे अभिमात्रतम साधक अत्यंत तेजस्वी, उत्साही, शुरवीर, शास्त्र जाणणारा, सुखदु:खात, तारुण्य आहे, प्रमाण भोजी आहे, निर्भय आहे, कर्मात निपुण आहे, पवित्र आचारण आहे, दानशुर आहे, चित्त स्थिर आहे, संतोषी आहे, निरोगी आहे, विश्वासु आहे, अशा लक्षणांनी युक्त साधक आहे. सदगुरु शरणागती पत्करल्यानंतर त्यांना फार काळ लागत नाही. गुरुच्या कृपेने एका वर्षात त्याला साक्षात्कार होऊ शकतो.

सदगुरुंची कृपा झाली तर ज्ञान प्राप्त झाले. मग तो आपल्या स्वत: च्या मस्तीमध्ये राहतो. जगाची पर्वा नाही, विश्वाची पर्वा नाही, अज्ञानाचे आवरण दूर झाले, गरुंच्या कृपेने दूर झाले. ज्ञान रुपी अंजन डोळ्यात गुरू घालतो, त्यामुळे मोक्ष रुपी धन दिसते. दिव्यावर दिवा लावला तर नंतर कळत नाही, पहिला दिवा कोणता लावला. तशी गुरू शिष्याची स्थिती एक झाली. तसेच गुरुपण आणि शिष्यपणही राहिले नाही. अशा स्थितीला पोहचले वृषभदेव. श्रीमदभागवतात पंचमस्कंदात वर्णन आले आहे. त्यांचा प्रसंग वर्ण्न करत महाराजांनी भगवंत भक्तीचा महिमा सांगितला. अज्ञानाचे आवरण संपल्यानंतर दु:ख संपणार, द्रष्टा म्हणुन फक्त राहायचे, कुठली आसक्ती नाही.

भक्ती आणि ज्ञान

भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय वारकरी सांप्रादयात आढळतो. काही लोक भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग वेगळे मानतात. पण ज्ञानाशिवाय भक्त नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. ज्ञान फक्त निराकार ब्रम्ह मानतात. दृश्य पदार्थ हे ज्ञानाच्यादृष्टीने सत्य नाही. अज्ञानाची भक्ती ही मोहाला कारण आहे. ज्ञानाची भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती ही या जिवाचा जीव पणा शिल्लक राहात नाही.

भक्त भगवंताला वेगळे मानतो. कारण भक्त आणि देव वेगळे नसतील तर आनंद कसा मिळेल. गायीला गायीच्या दुधाचा आनंद कसा मिळेल. दुधाचा आनंद वासरालाच मिळतो. याचा अर्थ भक्त अज्ञानी आहे, असे नाही. भक्ती करता स्विकारलेले द्वैत हे अद्वैतापेक्षा श्रेष्ठ, गोपि च्या भक्तीपेक्षा उध्दवाचे ज्ञान अपूर्ण आहे. गोपिंची ज्ञानोत्तर भक्ती होती. भक्ताला स्वप्न पडले तर त्यात देव दिसतो.

स्वप्न ही एक अवस्था, स्वप्न हे अंत:करणाच्या वृत्तीचा आरसा आहे. भक्ती करणार्‍या भक्ताला स्वप्नात देव दिसतात. स्वप्नात भगवत दर्शन. ध्यान अवस्थेत भगवंताचे दर्शन होते. प्रत्यक्ष भगवत दर्शन या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्वत्र भगवंत दर्शन! नामदेव महाराज यांच्या भजनात भगवंत नाचत होते. त्यांच्या गुरुच्या कृपेने भगवंत नाचत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com