भोगाची इच्छा संपणे म्हणजे वैराग्य : महंत रामगिरी
सार्वमत

भोगाची इच्छा संपणे म्हणजे वैराग्य : महंत रामगिरी

सदगुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताह

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

इहलोकातील आणि परलोकातील भोगाची इच्छा संपणे म्हणजे वैराग्य! असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.

योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या तिसर्‍या पुष्पाबद्दल दैनिक सार्वमत संवाद मध्ये ते बोलत होते. तथा सप्ताह समितीचे अध्यक्ष वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, बाबासाहेब जगताप, मधुकर महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, चंद्रकांत महाराज सावंत, गणेश महाराज शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज यांनी श्रीमदभागवतातील 16 व्या अध्ययातील पहिल्या श्लोकावर चिंतन करताना दैवी शक्तीची लक्षणे सांगितली, त्यात अभयम हे पहिलेच लक्षण सांगितले आहे. जिथे भय नाही, भयाची अनेक कारणे आहेत. भय केव्हा कधी नाहिसे होईल? जेव्हा द्वैत संपेल तेव्हा भय नष्ट होईल. द्वैत संपण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. इहलोकातील आणि परलोकातील भोगाची इच्छा संपणे म्हणजे वैराग्य! वैराग्याची विविध प्रकार सांगत महंत रामगिरी महाराज म्हणाले, वशिकर वैराग्य यात सत्याचा अभाव असतो, दोरीवर सर्प भासतो, दोरी म्हणजे सर्प नाही, हे भ्रमामुळे होते.

संसारातील दृष्य पदार्थ हे भ्रमरुपी असतात. या वैराग्याचे तीन प्रकार आहेत. मंद, तीव्र, तीव्रत्तर वैराग्य! मंद वैराग्याचे स्पष्टीकरण करताना महाराज म्हणाले, यात त्यागाची भावना निर्माण होते. नवरा बायकोचे भांडण होते, वैतागतो आश्रमात जातो, म्हणजेच या वैराग्यात प्रिय पदार्थाचा त्याग होतो. एखादा धनवान असतो, तो दरिद्री होतो. अनेकांना ते प्राप्त होते, पण नंतर ते संपून जाते. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वैराग्य निर्माण होत असेल तर ते मंद वैराग्य. पुराणातील धृवाचे उदाहरण सांगत महाराजांनी मंद वैराग्य स्पष्ट केले.

कुठली तरी अपेक्षा ठेवून केलेली तपस्या म्हणजे मंद वैराग्य. यावर धृवाची कथा सांगताना महाराज म्हणाले, धृवाला वैराग्य प्राप्त झाले पण तो राज्य, आणि संसार करायला पुन्हा आला ना, याशिवाय बंधू उत्तमला यक्षांनी मारले त्यांचा संहार धृवाने केला. धृवाने राज्य केले, त्यानंतर वृध्द अवस्थे मध्ये जे वैराग्य निर्माण झाले ते तीव्र वैराग्य! बालपणी जे वैराग्य निर्माण झाले होते ते मंद वैराग्य, मंद वैराग्य प्राप्त झालेल्या मनुष्याला संसारातून वैराग्य प्राप्त झाले तरी तो पुन्हा संसारात येतो. त्याच्या मनात असलेले संस्कार जात नाहीत. दुधात एखादा केर असेल ना, तर तो दूध उकळत असताना अधून मधून दिसतो. मंद वैराग्य दृढ नसल्याने साधकाला ते पुन्हा संसारात ढकलते. आणि दु:खाला कारण होते. साधक साध्याच्या जवळ जातात, परंतु पुन्हा दूर जातात.

अक्रोराचा प्रसंग

अक्रोर हा कृष्णाचा भक्त होता. त्याला कृष्ण भेटीची ओढ असते. परंतु पुढे तो कृष्णाच्या सासर्‍याची हत्या करतो. सतराजिताची हत्या करतो. शतधनव्याकडून हत्या घडवून आणतो. त्याला कारण सतराजिताकडे असणारा सिमंतक मणी! सूर्यउपासनेतून मणी सतराजिताकडे तो प्राप्त होतो. त्या मण्यापासून हजारो तोळे सोने मिळत असायचे, शतधनव्याला सांगितले अरे तुला आठवते का? तुझा विवाह सत्यभामेशी ठरला होता, तो विवाह मोडतो व तीचा विवाह कृष्णाशी होतो.

शतधनव्याला याची आठवण करून देत अक्रुर म्हणतो की, तुझा विवाह सत्यभामेशी झाला असता तर तो सिमंतक मणी तुला मिळाला असता. जरी सत्यभामा मिळाली नाही तरी सिंमतक मणी मिळवू शकतोस! शतधनव्याने सतराजिताची हत्या करून तो मणी मिळविला. मणी घेऊन आलेल्या शतधनव्याला अक्रोर म्हणाला, तू कृष्णाच्या सासर्‍याची हत्या केली आहे. तुला कृष्णा ठार करेल, तो मणी माझ्याकडे दे, मणी दिला, कृष्णाच्या भक्तीसाठी व्याकुळ होणार्‍या अक्रोराने हे काय केले? त्या अक्रोराची स्थिती महाराजांनी वर्णन केली.

कृष्ण क्रोधायमान झाले, त्यांनी शतधनव्याला पाठलाग करून ठार केले. तो मणी सापडला नाही. अक्रोर संशय येऊ नये म्हणून तीर्थयात्रेला गेले. या सोन्याचे काय करावे म्हणून जंगलात दान धर्म, अन्नछत्र सुरू केले. याची माहिती कृष्णाला समजते. अक्रोर दानशूर बनला, एवढे धन आले कुठून, भगवंताने अक्रोराचा शोध घेतला आणि त्याला दंडीत केले. मण्याकरिता कृष्णाच्या सासर्‍याची हत्या करतो, त्याचे वैराग्य कुठे गेले. हे मंद वैराग्य आहे. तीव्र वैराग्य, तीव्रत्तर वैराग्य यावर महाराजांनी प्रकाश टाकला.

परवैराग्याबद्दल महाराज म्हणाले, रज, तम हे दोन्ही गुण दु:खाला कारणीभूत आहेत. सत्व गुण मायेचा आहे. म्हणून तीन्हींचा त्याग यात आहे. वृत्ती ही निवृत्त झाली. त्यांना जग दिसत नाही अशी अवस्था म्हणजे परवैराग्य! रज, तम गुण जसे घातक तसे सत्व गुणही घातक यावर महाराजांनी एक नवरा बायकोचा प्रसंग सांगितला. एकाची बायको त्याला खुप त्रास देत होती. दररोज भांडणे व्हायची, तो खुप त्रासला, इतका त्रासला की, त्याने बायकोला मारुनच टाकले.

बायको मेली, ती झाली हाडळीन! बायको होती ती घरी त्रास द्यायची आता हाडळीन झाल्याने ती बाहेरही त्रास देऊ लागली. कुठेही गेला तरी ती बरोबरच, झोपेमध्ये स्वप्नातही हजर! हरिद्वार, ॠषीकेशला गेला तेथेही स्वप्नात हाडळीन. जिवंत होती तेव्हा घरी त्रास देत होती, आता मेल्यावर हाडळीन झाली तर रात्रंदिवस त्रास. पत्नी जिवंत होती त्रास देत होती, मेल्यावर आणखी त्रास देऊ लागली. कारण रज, तम, सत्व हे गुण मायेचे आहेत. जो या गुणांच्या पलिकडे गेला आहे, तो परमहंस. गुरूवचन आणि शास्त्र वचन यावर नितांत विश्वास म्हणजे श्रध्दा! सुख दु:ख, रोग कष्टावाचून सहन करणे.

रावणाचा संदेश !

संसारात अनेकांनी भागून पाहिले, सर्व गोष्टी मिळविल्या पण सार काहीच नाही. गुरुवर्य नारायणगिरी महाराज नेहमी उदाहरण सांगायचे, राम रावणाचे युध्द झाले. युध्दात रावण रणांगणात पडला. रामाने लक्ष्मणाला सांगितले जा रावणाकडून जगाला संदेश आण! लक्ष्मणाला प्रथमत: आश्चर्य वाटले, असे काय केले रावणाने जगाकरिता, संदेश देणारी व्यक्ती त्यात अचार विचार असावा. उपदेश करणाराच्याबद्दल श्रवण करणार्‍याच्या मनात आदर असावा, अन्यथा तो उपदेश सफल होत नाही.

उपदेश करणारा शुध्द असावा. उपदेशाचा परिणाम ऐकणारावर होईल? रावणाचा काय परिणाम होईल. रावण रणांगणात पडलेला, प्राण कंठात होता. लक्ष्मणाला पाहून रावण म्हणाला, माझी ही दयनिय अवस्था पहायला आला का? नाही, प्रभू रामाने मला तुमच्याकडे जगाला संदेश तुम्ही द्यावा यासाठी पाठविले. रावणाने सांगितले संदेश देण्यासारखे मी काय केले. रामाने सांगितले म्हणून सांगतो, सुखाकरिता मी खुप प्रयत्न केले. धन प्राप्त झाले म्हणजे सुख मिळेल. 7 कोटी घरे सोन्याची केली.

इतके धन, अनेक राज्यांवर स्वारी केली. कुबेरालाही लुटले, भोगातून सुख मिळेल असे वाटले, अनेक राज्याच्या कन्या, ॠषी कन्या यांना पळविले. काहींनी शाप दिले. तपस्याच्या बळाला जुमानले नाही. हळुहळु पापाचा घडा भरला. माझ्या अजुनही काही इच्छा होत्या त्या अपूर्ण राहिल्या. स्वर्गापर्यंत सीडी बनवायची होती. समुद्र गोड करू शकलो नाही. सोन्याला सुगंध आणण्याची इच्छा राहिली. अतृप्त अवस्थेच मी चाललो आहे. या निर्णयापर्यंत पोहचलो संसारात सुख नाही. एखाद्या सफल झालेल्यांचे विचार महत्त्वाचे तेवढेच विफल झालेल्याचे विचारही महत्त्वाचे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com